वडील महावीर फोगट यांच्यासह कुस्तीपटू बबिता फोगट भाजपमध्ये दाखल


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत मिळालेल्या यशानंतर भारतीय जनता पक्षात अनेक मातब्बर नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्यातच आज भाजपमध्ये भारताची प्रसिद्ध कुस्तीपटू बबिता फोगट वडील महावीर फोगट यांच्यासह दाखल झाली. त्यांनी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

बबिताने जम्मू-काश्मीरला स्वायत्ततेचा दर्जा देणारे ३७० कलम संपवल्यानंतर मोदी सरकारच्या समर्थनार्थ अनेक ट्विट केल्यानंतर तिने आता भाजपत प्रवेश केला आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भाजपत प्रवेश केल्यानंतर बबिता आणि महावीर फोगट यांनी भेट घेतली.

कलम ३७० हटवल्यानंतर बबिताने ट्विटमध्ये म्हटले होते की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा क्षण पहाण्याचे माझे भाग्य नव्हते. पण ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ पासून काश्मीरला मुक्ती मिळल्याचे पाहणे हे माझे भाग्य असेल. भारत माता की जय. दरम्यान, बबिताने हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुलींबाबत केलेल्या कथीत वादग्रस्त विधानाचे समर्थनही केले होते. तिने म्हटले होते की, मुलींचा अपमान होईल असे कोणतेही विधान मुख्यमंत्री खट्टर यांनी केलेले नाही, त्यांचे विधान माध्यमांनी कृपया चुकीच्या पद्धतीने जनतेसमोर मांडू नये.

Leave a Comment