आता क्रिकेटचा बॉल देखील होणार स्मार्ट

क्रिकेट सारख्या खेळात तंत्रज्ञानाचा वापर काही नवीन नाही. थर्ड अंपायरद्वारे देण्यात येणारा निर्णय मोठ्या स्क्रीनमध्ये दाखवण्यापासून ते अत्याधुनिक स्टंम्प्सपर्यंत क्रिकेटच्या अनेक गोष्टीत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे व काळानुसार त्यात बदल देखील केले जात आहेत.

अंपायर्सच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी डीआरएसची मदत घेतल्यावर हॉकआयच्या मदतीने बॉलने पिचवर कुठे टप्पा खाल्ला, बँट अथवा पँडला बॉल कुठे लागला हे सर्व माहिती पडते. मात्र आता याच्याही पुढे जाऊन क्रिकेट खेळात वापरण्यात येणारा बॉल देखील स्मार्ट होणार आहे. आता मायक्रोचिप असणारे बॉल आता क्रिकेटमध्ये वापरण्यात येणार आहेत.

रिपोर्ट्सनुसार, या बॉलचा सर्वात प्रथम वापर ऑस्ट्रेलियाच्या बिग बँश लीगमध्ये केला जाईल. बॉलची निर्मिती करणारी ऑस्ट्रेलियन कंपनी कुकाबुरा यासाठी तयार देखील झाली आहे. अनेक वैशिष्ट्यांमुळे या बॉलला स्मार्ट बॉल म्हटले जात आहे. लवकरच या बॉलचा वापर करण्यात येणार आहे.

मेलबर्नची कंपनी कुकाबुराने रियल टाइम डाटा मिळण्यासाठी बॉलमध्ये चिप लावली असून, त्यामुळे त्याला स्मार्ट बॉल म्हटले जात आहे. बॉलमध्ये एकप्रकारे ट्रँकर असेल, ज्यामुळे बॉल फेकताच डाटा मिळेल. यामध्ये रिलीज पॉईंटवर स्पीड मँट्रिक्स, प्री बाउंस आणि पोस्ट बाउंसचा समावेश आहे. या बॉलचा वापर सुरू झाल्यानंतर अंपायर्संना डीआरएसमध्ये मदत मिळेल. या बॉलमुळे बँट किंवा पँडला लागलेल्या बॉलची माहिती मिळेल व स्पिन गोलंदाजी करत असताना निर्णय घेण्यास मदत होईल.

Leave a Comment