आता मराठीतही पहा मोदींची खास उपस्थिती असणारा मॅन व्हर्सेस वाईल्ड


आज म्हणजेच सोमवारी १२ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती असणारा आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या मॅन व्हर्सेस वाईल्ड या कार्यक्रमाच्या खास भागाचे प्रसारण करण्यात येणार आहे. मोदी आणि बेअर यांच्यासोबत उत्तराखंडमध्ये असणाऱ्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात एका थरारक अशा सफरीचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान मोदी वन्यजीव संवर्धनाच्या मुद्यावर काही खास बेअरसमोर मुद्दे मांडणार आहेत, बेअरचेही विचार ज्यामध्ये सर्वांपर्यंत पोहोचणार आहेत. या खास भागाचे प्रोमो काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले होते. ज्यानंतर सर्वत्र या खास भागाचीच चर्चा झाली.


बेअरने या खास भागातविषयी अत्यंत महत्त्वाची बाब ‘एएनआय’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उघड केली. ज्यामध्ये या भागात कोणतेही किटक, किडा न खाल्ल्याचे त्याने स्पष्ट केले. मोदी हे पूर्णपणे शाकाहारी असल्यामुळे आपण असे काहीही न केल्याचे त्याने सांगितले.

रानावनात अडकल्यास, त्या परिस्थितीच जीव वाचवण्यासाठी प्राणी किंवा किटक खाणे महत्त्वाचे नाही. फळे, भाज्या, रानभाज्या, वनस्पती, कंदमुळे या गोष्टीही चालू शकतात, असे म्हणत मोदींनी त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे ही अशाच वातावरणात व्यतीत केली असल्यामुळे आता अशा वातावरण्यात वावरण्यात त्यांना कोणताच संकोचलेपणा वाटला नाही, असेही बेअरने सांगितले.

हा खास भाग साऱ्या विश्वात डिस्कव्हरी इंडिया वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. तुम्ही भारतात असाल तर, केबल आणि डिश टीव्ही नेटव्हर्कच्या सहाय्याने तुम्ही हा कार्यक्रम पाहू शकता. भारताबाहेर असणारेही हा भाग डिस्कव्हरी वाहिनीवर पाहू शकतात.

भारतीय प्रमाणवेळेनुसार १२ ऑगस्ट म्हणजेच सोमवारी रात्री ९ वाजचा हा कार्यक्रम सुरु होणार आहे. हा कार्यक्रम इंग्रजी, हिंदी, बंगाली, तामिळ, तेलुगू, कन्नड, मराठी, मल्याळम अशा आठ भाषांमध्ये पाहता येणार आहे. डिस्कव्हरीच्या १२ वाहिन्यांवर जो एकाच वेळी दाखवण्यात येणार आहे. यामध्ये डिस्कव्हरी, डिस्कव्हरी, एचडी वर्ल्ड, ऍनिमल प्लॅनेट, ऍनिमल प्लॅनेट एचडी वर्ल्ड, टीएलसी, टीएलसी एचडी वर्ल्ड, जीत, जीत प्राईम एचडी, डिस्कव्हरी सायन्स, डिस्कव्हरी टर्बो, डिस्कव्हरी किड्स अशा वाहिन्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्याचबरोबर हा भाग नेटफ्लिक्स आणि पीएमओच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुनही प्रसारित होणार आहे. पण, यासंदर्भातील तारखा अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही.

Leave a Comment