१६ ऑगस्टपर्यंत पुणे-मुंबई रेल्वेसेवा बंद


पुणे : काल संध्याकाळी मध्य रेल्वेने उशिरा जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता १६ ऑगस्टपर्यंत पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी गाड्या करण्यात आल्या आहेत. ११ ऑगस्टपर्यंत डेक्कन एक्स्प्रेस आणि प्रगती एक्स्प्रेस या गाडय़ाही धावणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. लांब पल्ल्याच्या विविध गाडय़ाही रद्द करण्यात आल्याने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. मुंबई आणि पुणे विभागासह इतर ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे गाडय़ा रद्द कराव्या लागत असल्याचे स्पष्टीकरण रेल्वेकडून देण्यात येत आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागात विविध ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने तसेच मिरज-लोंडा (कर्नाटक) विभागात लोहमार्गावर पाणी येऊन ते खचले आहेत. दरडी कोसळण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले आहेत. परिणामी पुणे-मुंबई लोहमार्गावरील तसेच अन्य लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ा गेल्या आठवडय़ापासून रद्द करण्यात येत आहेत. काही गाडय़ा अंशत: सोडण्यात येत असून, काहींच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे नियोजन कोडमडले असून, त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

११ ऑगस्टपर्यंत पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाडय़ा रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात आला होता. पण १६ ऑगस्टपर्यंत या गाडय़ा रद्द ठेवण्याचा निर्णय दुसऱ्याच दिवशी घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस या गाडय़ाही रद्द करण्यात येत आहेत. आता त्या ११ ऑगस्टपर्यंत रद्द राहणार असल्यामुळे पुण्याहून मुंबईकडे किंवा मुंबईहून पुण्याकडे येण्यासाठी ११ ऑगस्टपर्यंत एकही रेल्वे नाही. पुणे-मुंबई दरम्यान रोजचा प्रवास करण्याची आवश्यकता असणाऱ्यांनी एसटी बसचा आधार घेतला असला, तरी त्या पुरेशा प्रमाणात नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे खासगी वाहतूकदारांकडून अडलेल्या प्रवाशांची लूट होत असल्याचेही वास्तव आहे.

Leave a Comment