विकी कौशलने उरीसाठी चे अॅवॉर्ड सेनेला केले अर्पण


शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या २०१८ साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारात यंदा प्रचंड गाजलेल्या उरी द सर्जिकल स्ट्राईक मधील भूमिकेसाठी अभिनेता विकी कौशल याला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार आयुष्मान खुरानासह विभागून दिला गेला आहे. या पुरस्काराने भावूक झालेल्या विकीने हा पुरस्कार त्याचे आईवडील, उरीची सर्व टीम आणि भारतीय सेनेला समर्पित केला आहे.

विकीने या संदर्भात केलेल्या ट्विट मध्ये कोणत्याही अभिनेत्याचे पुरस्कार मिळावेत असे स्वप्न असते आणि त्यातून तो राष्ट्रीय पुरस्कार असेल तर विशेष अभिमान असतो असे म्हटले आहे. आपले हृद्य मोकळे करताना विकी म्हणतो, हा पुरस्कार म्हणजे माझ्या कामाचा सन्मान आहे. हा पुरस्कार मी माझे आईवडील, उरी टीम आणि भारतीय सेनेला समर्पित करतो. याच बरोबर विकीने आयुष्मान खुराना याचेही पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

विकीला उरी साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाल्यावर या संदर्भात अनेक शंका सोशल मिडीयावर उपस्थित झाल्या आहेत. काहींच्या मते हे पुरस्कार २०१८ साठी आहेत आणि उरी ११ जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित झाला असूनही त्याचा पुरस्कारासाठी कसा काय विचार केला गेला. यावर असा खुलासा करण्यात आला आहे की, सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन मार्गदर्शक तत्वानुसार एखाद्या चित्रपटासाठी बोर्डाने १ जानेवारी ते ३१ डिसेम्बर या काळात प्रमाणपत्र दिले असेल तर त्या चित्रपटाचा विचार राष्ट्रीय पुरस्कारासाठी करता येतो. उरी चित्रपटाला ३१ डिसेंबरला प्रमाणपत्र मिळाले होते त्यामुळे त्याचा विचार केला गेला.

Leave a Comment