अति उपयुक्त आहे लदाखची सोली वनौषधी


जम्मू काश्मीरला विशेष राज्य दर्जा देणारे कलम ३७० संसदेत रद्द करून घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात लदाखमधील संजीवनी बुटीचा उल्लेख केला आणि त्यानंतर या वनौषधीबद्दल लोकांचे कुतूहल एकदम जागृत झाले. लदाखमध्ये सापडणारी ही वनौषधी स्थानिक भाषेत सोली नावाने ओळखली जाते तर वैज्ञानिक भाषेत तीचे नामकरण रेडिओला असे केले गेले आहे.

रामायण युद्धात लक्ष्मण मूर्च्छित झाला तेव्हा हनुमानाने त्याच्यासाठी द्रोणागिरी पर्वतावरून आणलेल्या संजीवनी बुटी मध्ये जे गुण होते तेच या सोली वनौषधीमध्ये असावेत असा संशोधकांचा कयास असून त्यामुळेच या वनस्पतीला मोदी यांनी संजीवनी असे संबोधले होते. हिमायायात अति उंचीवर जेथे हवा अतिशय विरळ असते आणि प्राणवायूचे प्रमाण अतिशय कमी असते अश्या ठिकाणी माणसाच्या शरीरात दुर्बलता येथे ती या वनौषधीमुळे थांबविता येते असे दिसून आले असून ही वनस्पती माणसाची रोग प्रतिकारक शक्ती वाढविते. तसेच किरणोत्सर्गापासून माणसाला संरक्षण देते असे दिसून आले आहे.

लेह मधील डिफेन्स इंस्टीट्युट ऑफ हाय अल्टीट्युड रिसर्च मधील संशोधक गेली दहा वर्षे या वनस्पतीवर संशोधन करत आहेत आणि त्यांना या वनस्पतीत चकित करतील असे अनेक गुण सापडले आहेत. डीआरडीओच्या जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेल्या कृषी, प्राणी शोध प्रयोगात या वनस्पतीवर संशोधन होत आहे. लेह मधील संस्थेचे प्रमुख आर.बी श्रीवास्तव मिडीयाला माहिती देताना म्हणाले, या वनस्पतीच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते असे दिसून आले आहे. येथे या वनस्पतीच्या पानांची भाजी खाल्ली जाते. सीकोन्डरी मेटाबोलाइट्स, फायटोअॅक्टीव्ह अशी अति महत्वाची तत्वे या वनस्पतीत आहेत. बॉम्ब वर्षावात अथवा बायोकेमीकल रेडीएशनचा प्रभाव ती कमी करतात.

हिमालयाच्या अतिउंच आणि दुर्गम भागात तैनात सैनिकांसाठी ही वनस्पती संजीवनीचे काम करू शकते आणि कमी हवा, कमी प्राणवायू अश्या ठिकाणी योग्य प्रकारे जिवंत राहण्यासाठी उपयुक्त ठरू शकते असा संशोधकांचा दावा आहे. अति उंचीवर माणसाची भूक कमी होते, ही वनस्पती भूक वाढविणारी आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment