‘भारत रत्न’ पुरस्काराने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सन्मानित


नवी दिल्ली – गुरूवारी ‘भारत रत्न’ या देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना सन्मानित करण्यात आले. मुखर्जी यांना हा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आल्यामुळे आजी राष्ट्रपतींच्या हस्ते माजी राष्ट्रपतींना भारतरत्न मिळत असलेला योगायोग पहायला मिळाला. राष्ट्रपती भवनात काल संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

‘भारत रत्न’ पुरस्काराने मुखर्जी यांच्यासोबतच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची या पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती. या पुरस्काराने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले होते.

हिंगोली जिल्ह्यातील कडोली येथे जन्मलेले नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले ज्येष्ठ नेते होते. जनसंघाचे नेते असलेले नानाजी हे राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी आणीबाणीत उजव्या आणि डाव्या पक्षांना समान राजकीय कार्यक्रम देण्यात आणि इंदिरा गांधींविरोधात संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. चित्रकूट येथे त्यांनी भारतीय संस्कृती आणि शिक्षण या बाबतीत मोठे कार्य केले होते. २०१० मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

आसामी चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून भूपेन हजारिका यांनी मोठे कार्य केले. आसामीबरोबरच हिंदी आणि बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते. चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने आणि पद्म किताबानेही त्यांचा गौरव झाला होता.

Leave a Comment