अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध होणार कुख्यात आरोपींची सर्व माहिती


मुंबई : गेल्या आठवड्यात ‘ऑटोमेटेड मल्टिमॉडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम’ महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केले असून गुन्हेगारी विश्वातील छोट्यातील छोटी माहितीदेखील याद्वारे आता सहज उपलब्ध होणार आहे. ‘अ‍ॅम्बिस’ म्हणूनही ही यंत्रणेस ओळखली जात आहे. याच माध्यमातून आता कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुठे आणि काय करत आहे ? त्याचबरोबर तो जिवंत आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आता केवळ एका क्लिकवरच उपलब्ध होणार आहेत. कुठलाही आरोपी कोणत्याही देशात आणि शहरात असेल तर त्याची संपूर्ण माहिती या यंत्रणेद्वारे केवळ एक बटण दाबताच ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.

याबाबत महाराष्ट्र पोलिसांतील अधिकाऱ्यांनुसार, लवकरच नॅशनल क्राइम ब्युरो आणि इंटरपोलला देखील ही यंत्रणा जोडण्यात येणार आहे. सर्व तपास संस्थांशी संबंधित यंत्रणा जोडली गेल्यानंतर परदेशात पसार झालेला दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसारख्या अंडरवर्ल्ड डॉन तसेच दहशतवादासंदर्भात जोडली गेलेली प्रत्येक माहिती इंटरपोलला देखील पुरवली जाईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘अ‍ॅम्बिस’ हे ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले जात आहे. सीआयडी आणि सायबर पोलीसचे आयजी बृजेश सिंह यांनी या यंत्रणेवर प्रचंड मेहनत घेतली आहे. ही यंत्रणा सध्या मुंबईतील 94 पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील 1200 पोलीस स्टेशनमध्येही ही यंत्रणा जोडली जाईल. या यंत्रणेमध्ये प्रत्येक आरोपीच्या बोटांच्या ठशांसहीत त्याने कोणकोणते गुन्हे केले आहेत, केव्हा-केव्हा कारागृहात त्याला डांबले गेले आहे, यासह सर्व महत्त्वाची माहिती उपलब्ध असणार आहे.

Leave a Comment