लदाखचे खासदार नामग्याल यांना मित्रांचे झाले अजीर्ण


जम्मू काश्मीरसाठी विशेष राज्य दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचे विधेयक संसदेत मांडले गेल्यावर ज्या मोजक्या खासदारांनी त्यावर भाषणे केली त्यात लदाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांचे भाषण खूपच प्रभावी झाले आणि पंतप्रधान मोदी यांनी त्याचे त्याबद्दल विशेष कौतुक केले. या ३४ वर्षीय खासदाराला त्यामुळे निराळ्याच अडचणीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. या भाषणामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वेगाने वाढली असून त्यांना फेसबुकवर लाखोनी फ्रेंड रिक्वेस्ट येऊ लागल्या आहेत. यामुळे जमयंग यांना मित्रांचे अजीर्ण झाले असल्याचे सांगितले जात आहे.

नामग्याल हे भाजपचे खासदार आहेत. त्यांनी कलम ३७० रद्द करण्याबाबत पाठींबा देताना केलेल्या भाषणात लदाखच्या वेदना मांडल्या. हे भाषण इतके प्रभावी होते कि विरोधी पक्षातील खासदारांनी सुद्धा त्यांचे कौतुक केले. भाषण ऐकणाररया लोकांनाही ते खूपच आवडले आणि त्यांनी नामग्याल यांना फ्रेंड रिक्वेस्ट टाकायला सुरवात केली. शेवटी नामग्याल यांनी पोस्ट लिहून अश्या रिक्वेस्ट स्वीकारू शकत नाही, कारण अगोदरच मला ५ हजार फ्रेंड आहेत असे नमूद केले.

नामग्याल लोकसभेत प्रथमच खासदार बनले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले नामग्याल कॉलेज जीवनापासून राजकारणात रस घेऊ लागले आणि २०१२ मध्ये त्यांनी भाजपचे सदस्यत्व घेतले. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार थुप्सस्तान चावांग याचा जोरदार प्रचार करून त्यांना विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. यंदाच्या निवडणुकीत त्यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आले. नामग्याल यांचा विवाह फेब्रुवारी २०१९ मध्ये झाला असून त्यांची पत्नी सोनम वांगमो सरकारी कॉलेज मध्ये असोसिएट प्रोफेसर आहे.

Leave a Comment