या मंदिरात आहेत शेकडो शिवलिंगे


श्रावण महिन्यात शिवपूजेचे विशेष महत्व आहे. राजस्थान राज्यात देशातील एकमेव आगळे वेगळे शिवमंदिर पाहायला मिळते. येथे भाविकांची सतत गर्दी असते आणि श्रावणात ती अधिक वाढते. तरीही येथे प्रत्येकाला अभिषेक, पूजा करण्यासाठी अजिबात घाई गर्दी करावी लागत नाही कारण या शिवपुरी धाम शिवमंदिरात चक्क ५२५ शिवलिंगे आहेत.

राजस्थानच्या कोटा शहरात चंबळ नदीच्या पूर्वेकडच्या काठाला हे अनोखे मंदिर आहे. येथे येऊन मनोभावे पूजाअर्चा करणाऱ्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. या मंदिरात शिवलिंगांची एक मोठी साखळीच असून स्वस्तिकच्या आकारात ही ५२५ शिवलिंगे आहेत. त्यामुळे कितीही गर्दी असली तरी भाविकांना महादेवाचे दर्शन आरामात होते. अभिषेकासाठी घाई करावी लागत नाही. ही शिवलिंग देशाच्या विविध तीर्थस्थळातून, पवित्र नद्यातून आणून येथे विधिवत त्यांची स्थापना केली गेली आहे.


असेही सांगितले जाते की याच ठिकाणी महादेवाने विष्णू आणि ब्रह्मा यांचा अहंकार तोडला होता. मंदिरात ५२५ शिवलिंग आहेतच पण १५ फुट उंच आणि ६ फुट परीघ असलेले १४ टन वजनाचे भव्य शिवलिंगही आहे. ही पशुपतीनाथाची प्रतिमा असल्याचे सांगतात. मंदिरात गणेश, देवी यांच्यासह अन्य देवतांच्या मूर्ती आहेत. या मंदिरात भवसागर यंत्र स्थापन केले गेले असून येथील अमृत सरोवरात १०८ तीर्थांचे पाणी आहे असे सांगतात.

Leave a Comment