समाजातील विरोध झुगारुन पार पडला तृतीयपंथीयांचा पहिलाच विवाह सोहळा


कोलकाता – तृतीयपंथीयांचा पहिला विवाह सोहळा पश्चिम बंगालमध्ये पार पाडला असून वधू तिस्ता आणि वर दीपन या दोघांनीही लग्नगाठ बांधली. पण अनेकांच्या पचनी तृतीय पंथीयांचा विवाह ही कल्पना पडली नाही. पण समाजातून होणार विरोध झुगारुन या दोघांनी विवाह केला. हा विवाह सोहळा निवडक नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडला.

बनारसी साडी लग्नामध्ये वधूने घातली होती. तर वराने कुर्ता आणि धोतर घातले होते. दीपन आणि तिस्ता यांचा अनोखा विवाह सोहळा १०० जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. पुरुष म्हणून वधू तिस्ता जन्माला आली होती. तिचे नाव सुशांत असे होते. पण, तिला जेव्हा आपल्यात मुलीचे गुणधर्म असल्याचे जाणवले तिला तेव्हा अस्वस्थ वाटू लागले. मुलगी असल्याचे समाजापुढे तिने जाहीर केले. लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय तिने घेतला. तिला यासाठीही विरोध झाला. तिने अनेक वर्षांच्या लढ्यानंतर २००४ साली लिंगबदल शस्त्रक्रिया केली. ती शस्त्रक्रियेनंतर समाजामध्ये मुलगी म्हणून वावरु लागली.

तर मुलगी म्हणून वर दीपन जन्माला आला होता. कुटुंबीयांनी त्याचे नाव दिपन्विता असे ठेवले होते. पण आपण मुलगी नसून मुलगा असल्याची जाणीव दीपनलाही झाली आणि त्याने मुलगा असल्याचे जाहीर केले. कोलकात्यात नोकरी करत असताना दोघांची ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर काही दिवसांतच प्रेमामध्ये झाले. दोघांनीही त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय काही सोपा नव्हता. त्यांना त्यासाठी कुटुंबाचा आणि समाजाचा विरोध पत्करावा लागला.

शेजाऱ्यांचा आणि नातेवाईकांचा टोकाचा विरोध लिंग बदल करताना पत्करावा लागला. त्यांनी माझ्या घरावर हल्ला देखील केला. त्यांनतरही न झुकता मी हे लग्न केले, हे महत्त्वाचे आहे, अशा भावना तिस्ताने व्यक्त केल्या. आमच्या लग्नाद्वारे आम्ही दोघेही इतर लोकांसारखेच सर्वसामान्य असल्याचा संदेश समाजाला जाईल. तृतीयपंथीही समाजाचा भाग आहेत. तेही प्रेमामध्ये पडू शकतात. आपल्या समाजामध्ये सर्व काही शक्य असल्याचे दीपन याने लग्नानंतर मत व्यक्त केले.

Leave a Comment