पाकिस्तानने रद्द केली समझौता एक्सप्रेस


नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरसाठी असलेले कलम 370 रद्द केल्यानंतर तीळ पापड झालेल्या पाकिस्तानने भारत-पाकिस्तान दरम्यान प्रवाश्यांची ने-आण करणारी समझौता एक्सप्रेस रद्द केली आहे. भारतात पाकिस्तानमधून येणारी ट्रेन आज न आल्यामुळे अटारी सीमेवर समझौता एक्सप्रेसचे प्रवासी अडकून पडले. पण याबद्दल अद्याप भारताने अधिकृत माहिती दिलेली नाही. पण या ट्रेनचा ड्रायव्हर आणि गार्डला ट्रेन सुरू न करण्याच्या सूचना पाकिस्तानने दिल्या असल्याची माहिती आहे.

याबाबत अटारी आंतरराष्ट्रीय रेल्वे स्टेशनचे अधीक्षक अरविंदकुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, समझौता एक्सप्रेस पाकिस्तानमधून भारतात येणे अपेक्षित होते. पण समझौता एक्सप्रेस सीमेवरून भारतीय रेल्वेने आपला ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांना पाठवून घेऊन जावी, असा संदेश आला. रेल्वेसुरक्षेच्या कारणासाठी हा निर्णय पाकिस्तानने घेतला असे त्यांचे म्हणणे आहे. आता समझौता एक्सप्रेस आणण्यासाठी भारतीय रेल्वेचे ड्रायव्हर आणि ज्यांच्याकडे व्हिसा आहे अशा कर्मचाऱ्यांना पाठवले जाणार आहे.

पाकिस्तानने याआधी भारताशी संबंध तोडल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर भारताला युद्धाची धमकीही दिली होती. पाकिस्तानने भारताच्या विमानांना आपल्या हवाई हद्दीत येण्याची परवानगीही नाकारली आहे. भारताशी व्यापारविषयक संबंध तोडल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहम्मूद कुरेशी यांनी टीव्हीवरून जाहीर केले. भारतीय चित्रपट पाकिस्तानमध्ये दाखवण्यावरही इम्रान खान यांच्या सरकारने बंदी घातली आहे.

Leave a Comment