या शिवमंदिराचा आहे द्रौपदीशी संबंध


श्रावण महिन्यात शिवाच्या उपासनेला विशेष महत्व दिले जाते. भारतात अनेक शिवमंदिरे आहेत त्यातील काही खास आहेत. उत्तरप्रदेशाच्या कानपूर जवळ ४० किमीवर असलेल्या रघुनाथपूर गावात असेच एक विशेष शिवमंदिर असून त्याला पांचाळेश्वर मंदिर म्हटले जाते. या शिवमंदिराचा संबंध द्रौपदीशी आहे.

याची कथा अशी सांगतात की वनवासात असताना पांडव येथे काही काळ राहिले होते तेव्हा द्रौपदीने येथे शिवउपासना केली होती. तिच्या उपासनेवर प्रसन्न होऊन महादेव येथे शिवलिंग स्वरुपात प्रकटले. द्रौपदीचे एक नाव पांचाली असेही होते त्यामुळे या शिवमंदिराला पांचाळेश्वर असे नाव पडले. त्यामुळे हे शिवलिंग द्वापरयुगातील असल्याचे मानले जाते. पूर्वी हे शिवलिंग सोन्याप्रमाणे चमकत असे.

शेकडो वर्षापूर्वी या ठिकाणी बंजारा लोकांचा तांडा आला होता तेव्हा त्यांनी हे शिवलिंग सोन्याचे समजून ते उखडण्याचा प्रयत्न केला. त्या शिवलिंग भंगले पण त्यातून विषारी नाग बाहेर पडले आणि या बंजारी लोकांना चावले. त्यानंतर आलेल्या संतांच्या गटाने घोर तपस्या करून भोलेबाबांचा राग शांत केला.

मंदिरातील शिवलिंगाजवळ आठ काळे नाग पाहिल्याचे सांगितले जाते त्यामुळे मंदिर बांधताना घुमटाच्या आत आठ नागांच्या प्रतिमा कोरल्या गेल्या आहेत. स्थानिक पुजारी सांगतात आजही गर्भगृहात अनेकदा नाग येतात. त्याच्यासाठी रात्री गर्भगृहात दुध ठेवले जाते. हे नाग दुध पितात अशी लोकांची श्रद्धा आहे.

Leave a Comment