बीसीसीआयने पाठवली राहूल द्रविडला नोटीस, गांगुलीसह हरभजन भडकला


मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शिस्तपालन अधिकाऱ्याने जगभरात भारतीय संघाचा ‘द वॉल’ अशी ओळख असलेला माजी कर्णधार राहुल द्रविड यावर हितसंबध जपण्याचे गंभीर आरोप लावले आहेत. राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा द्रविड हा सध्या प्रमुख असून त्याला बीसीसीआयने नोटीस पाठवली आहे. लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी. के. जैन यांनी ही नोटीस मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांच्या तक्रारीच्या आधारावर पाठवली आहे.

राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचा द्रविड हा प्रमुख आहे. तसेच इंडिया सिमेट ग्रुपचा तो उपाध्यक्ष आहे. त्यांचा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स हा संघ खेळत असल्याची तक्रार संजीव गुप्ता यांनी केली आहे. डी. के जैन यांनी त्यावर द्रविडला नोटीस पाठवली आहे.

जैन याविषयी बोलताना म्हणाले, आम्ही गेल्या आठवड्यात राहुल द्रविड यांना हेतुसंबंध जपण्याच्या मुद्यावरुन नोटीस पाठवली असून द्रविडकडे या नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. आम्ही त्यांच्या उत्तरानंतर पुढील कारवाई ठरवू.

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने द्रविडला नोटीस पाठवल्याने बीसीसीआयचा समाचार घेतला. तो म्हणाला, राहुल द्रविडसारखा चांगला माणूस भारतीय क्रिकेटला मिळू शकत नाहीत. द्रविडला अशा प्रकारची नोटीस बीसीसीआयने पाठवणे म्हणजे त्याचा अपमान आहे. दरम्यान, या प्रकरणी भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने बीसीसीआयवर कडाडून टीका केली आहे.

Leave a Comment