टायटॅनिक बनविणारी हार्लंड अँड वोल्फ कंपनी बुडाली


जगप्रसिद्ध टायटॅनिक जहाज बनविणारी हार्लंड अँड वोल्फ कंपनी सोमवारी बंद करण्यात आली. १५८ वर्षांच्या या जुन्या आणि नामवंत कंपनीत १०० वर्षापूर्वी ३५ हजार कामगार होते आणि सोमवारी ती बंद झाली तेव्हा कंपनीतील कामगारांची संख्या १२३ वर आली होती. सतत नुकसानीत जात असलेल्या या कंपनीचे दिवाळे निघाले होते. १९०९ ते १९११ या काळात येथे टायटॅनिक हे अलिशान जहाज बांधले गेले होते आणि उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट मध्ये ३१ मार्च १९११ मध्ये त्याचे अनावरण करण्यात आले होते.


ही कंपनी प्रथम चर्चेत आली ती एप्रिल १९१२ मध्ये. या दिवशी अतिविशाल आणि अलिशान टायटॅनिक पहिल्या वहिल्या समुद्र प्रवासासाठी रवाना झाली आणि कधीही न बुडणारे जहाज अशी जाहिरात केले गेलेले हे जहाज त्याच्या पहिल्याच प्रवासात हिमनगाला धडकल्याने समुद्रात बुडाले. त्यात १५१७ लोक ठार झाले आणि नौकानयनाच्या क्षेत्रातील सर्वाधिक भीषण अपघाताची नोंद झाली. या जहाजाचे अवशेष १ सप्टेंबर १९८५ मध्ये अमेरिकेच्या माजी नौसेना कमांडर रोबर्ट दुआने बालार्ड याने शोधले होते.

हार्लंड अँड वोल्फ कंपनीने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुमारे १५० लढाऊ जहाजे बांधली होती पण १९४५ नंतर कंपनी जहाज बांधणी उद्योगापासून दूर गेली. बंद होण्यापूर्वी ही कंपनी जलउर्जा आणि समुद्री अभियांत्रिकी योजनावर काम करत होती.

Leave a Comment