जम्मू काश्मीर मध्ये अमूल करणार गुंतवणूक


केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर या प्रदेशाच्या विकास आणि गुंतवणुकीचा रस्ता खुला झाला आहे. डेअरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने सरकारला संपूर्ण सहकार्याची तयारी दर्शविली आहे. ही संस्था अमूल या नावाने देशभरात दुध आणि दुध उत्पादनांची विक्री करते.

मिळालेल्या माहितीनुसार फेडरेशनच्या मुख्य सदस्यांनी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांशी नुकतीच चर्चा केली होती आणि तेथील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी बोलणी करून डेअरी उद्योगासाठी आवश्यक ते सर्व तंत्रज्ञान पुरवून दुध खरेदीची तयारी दाखविली होती. आता या संस्थेने जम्मू काश्मीर मध्ये गुंतवणूक करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

अमूलचे वरिष्ठ अधिकारी माहिती देताना म्हणाले, काश्मीरमध्ये दुध उत्पादन क्षेत्र अद्यापि मागास आहे. येथे दुध उत्पादन खर्च जादा येतो आणि येथील दुध उत्पादकांना खासगी दुध उत्पादकांशी स्पर्धा करावी लागते यामुळे येथील शेतकरी दुध उत्पादनाकडे फारसे वळत नाहीत. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने जम्मू काश्मीर मध्यील शेतकऱ्यांना या अंतर्गत सर्व सहाय्य देऊ केले असून दुध प्रक्रिया आणि विपणन यातही सहकार्याची तयारी दाखविली आहे.

सध्या या प्रदेशात दोनच प्रक्रिया प्रकल्प आहेत आणि त्यांची क्षमता ५० हजार लिटरची आहे. काश्मिरी महिला स्वमदत गटात काम करू लागल्या आहेत. गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन सध्या २० ते २५ हजार लिटरची खरेदी करत आहे आणि स्नो कॅप नावाने ते विकले जात आहे. या प्रदेशात आजही खुले दुध विक्रीचे प्रमाण अधिक आहे.

Leave a Comment