झुंझार नेत्या सुषमा स्वराज कालवश


मोदी सरकारमधील माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असतानाचा त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या मागे पती कौशल स्वराज आणि कन्या बासुरी असा परिवार आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनाने देशभर शोक पसरला असून अनेकांना धक्का बसला आहे.

सुषमा यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणले गेले असून आज दुपारी ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुषमा यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय नेते त्याच्या घरी पोहोचू लागले असून पंतप्रधान मोदींसह त्यांचे बहुतेक सर्व मंत्री सुषमा यांच्या निवासस्थानी दाखल होऊ लागले आहेत. देशाच्या सर्व थरातून सुषमा यांना श्रद्धांजली वाहिली जात असून समाज माध्यमांवर लोक त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.

सुषमा यांनी त्यांच्या राजकीय जीवनात अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत. त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या, अटलबिहारी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होत्या तर मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. देशाबाहेर राहणाऱ्या भारतीय समुदायात त्या विशेष लोकप्रिय होत्या कारण त्यांच्या कोणत्याही समस्या त्या त्वरेने सोडवीत असत.

Leave a Comment