कलम 370; राज ठाकरेंची मोदी सरकारच्या निर्णयावर पहिल्यांदाच सहमती


मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य सभेत जम्मू काश्मीरमध्ये घटनेतून कलम 370 हटवण्याची शिफारस मांडल्यानंतर बराच गदारोळ राज्यसभेत झाला. या निर्णयावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर या निर्णयाचे स्वागत काही लोकांनी केले आहे. तसेच मोदी सरकारवर लोकसभा निवडणूकीत कडाडून हल्ला करणाऱ्या राज ठाकरेंनीही केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.


राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय, असे ट्विट करत या निर्णयाचे स्वागत केले आहे. याबरोबरच शिवसेनेकडूनही सरकारच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत जोरदार भाषण करत मोदी सरकारचे कौतुक केले.

तर मोदी सरकारच्या कट्टर विरोधकांपैकी आम आदमी पक्ष आणि तेलगू देसम पक्षानेही निर्णयाचे स्वागत केले आहे. एआयएडीएमके, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, अकाली दल, लोकजनशक्ती पार्टी, आरपीआय, शिवसेना या पक्षांनी कलम 370 रद्द करणाऱ्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Leave a Comment