भारताच्या त्या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागणार पाकिस्तान


नवी दिल्ली – राज्यसभेत काल जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. भारत सरकारच्या हे कलम रद्द करण्याच्या निर्णयाचा पाकिस्तानने निषेध केला असून आंतरराष्ट्रीय न्यायालयात या मुद्यावरुन दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.

खतरनाक खेळ भारताने खेळला असून भयानक असा या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद कुरेशी यांनी म्हटले आहे. काश्मीरच्या समस्यांचे समाधान इम्रान खान काढू इच्छित आहेत. पण, ही समस्या भारत आणखी बिकट करत असून पहिल्यापेक्षा अधिक कडक पहारा काश्मीरच्या लोकांवर ठेवला आहे. याविषयी आम्ही संयुक्त राष्ट्र आणि इस्लामिक राष्ट्रांना सांगितल्याचेही ते म्हणाले. माध्यमांच्या माहितीनुसार, इम्रान खान यांनी भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तान संसदीय समिती बैठक बोलावली आहे.

नरेंद्र मोदींचा हा एकतर्फी निर्णय असून काश्मीर हे एक आंतरराष्ट्रीय वादग्रस्त क्षेत्र आहे. भारतीय सरकारचा हा निर्णय काश्मीरच्या लोकांना देखील मान्य नसेल. पाकिस्तान काश्मिरी नागरिकांना समर्थन देत राहील. सर्व मुस्लीम समुदायाने एकत्र येत काश्मिरी नागरिकांच्या सुरक्षेची प्रार्थना करू, असे पाकिस्तान विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

याचबरोबर भारताच्या निर्णयाचा पाकिस्तानचे राष्ट्रपती आरीफ अल्वी यांनी निषेध केला आहे. काश्मिरी जनता आणि संयुक्त राष्ट्रांच्या विरुद्ध भारताचा हा निर्णय आहे. काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार या समस्यांवर समाधानपूर्वक उपाय काढण्यावर पाकिस्तान सरकारचा भर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment