तिन्ही प्रकाराच्या क्रिकेटमधून न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज ब्रॅडन मॅक्युलमची निवृत्ती


वेलिंग्टन – सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून न्यूझीलंडचा माजी कर्णधार, स्फोटक फलंदाज ब्रॅडम मॅक्युलमने निवृत्ती जाहिर केली. न्यूझीलंड संघाला मॅक्युलमने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले आहेत. तो सध्या ग्लोबल टी-२० कॅनडा लीगमध्ये खेळत असून तो ही स्पर्धा संपल्यानंतर निवृत्ती घेणार आहे. त्याने याबद्दल एक प्रसिद्धीपत्रक ट्विटरवर पोस्ट करत आपला निर्णय जाहीर केला आहे.

प्रसिद्धीपत्रकात त्याने म्हटले आहे की, आज मोठ्या अभिमानाने आणि समाधानाने मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर करत आहे. मी ग्लोबल कॅनडा लीगनंतर निवृत्ती घेत आहे. जे २० वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत मिळवले, मला त्याचा अभिमान आहे. खेळात पहिल्यांदा प्रवेश केल्यानंतर स्वप्नातही विचार केले नाही, एवढे यश मिळाले आहे. पण, मला अलिकडच्या काही महिन्यात कामगिरीमध्ये सातत्य राखणे कठीण वाटत आहे.


उल्लेखनीय बाब म्हणजे, आयपीएलच्या पहिल्याच सत्रातील पहिल्याच सामन्यात मॅक्युलमने १५८ धावांची ताबडतोड खेळी केली होती. आयपीएलच्या इतिहासात पहिले शतक ठोकण्याचा मान त्याच्याच नावावर आहे. मॅक्युलमने निवृत्ती जाहीर करताना त्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल कुटुंब, सहकारी, प्रशिक्षक, मीडिया आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून फेब्रुवारी २०१६ मध्ये मॅक्युलमने निवृत्ती घेतली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मॅक्युलमने न्यूझीलंडकडून खेळताना २६० एकदिवसीय सामन्यात खेळताना ६०८३ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतके आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. तर १०१ कसोटी सामन्यात खेळताना त्याने ६४५३ धावा केल्या असून त्यामध्ये १२ शतके आणि २१ अर्धशतके ठोकली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी-२० करियरमध्ये ७१ सामन्यात खेळताना २१४० धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.

Leave a Comment