कलम ३७०; शाहिद आफ्रिदीचे थोबाड गौतम गंभीरने केले बंद


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर ऐतिहासिक विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आले. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासाठी प्रस्ताव मांडला. राज्यसभेत यानंतर यावर चर्चा झाली, राज्यसभेने या चर्चेनंतर जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला मंजुरी दिली. कलम ३७० आवाजी मतदानाने १२५ विरुद्ध ६१ अशा मताने रद्द करण्यात आले. कलम ३७० सोबतच कलम ३५ एदेखील रद्द करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरबाबत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. पाकिस्तान याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि संयुक्त राष्ट्रामध्ये जायच्या तयारीत आहे. तर पाकिस्तानमधूनही भारताच्या या निर्णयाविरोधात प्रतिक्रिया येत आहेत. या मुद्द्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी बरळला आहे.


काश्मिरींना त्यांचे अधिकार संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार दिले पाहिजेत. त्यांना देखील आपल्यासारखेच स्वातंत्र्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. संयुक्त राष्ट्राची निर्मिती का झाली आहे? ते झोपलेले का आहेत? काश्मीरमध्ये होत असलेले आक्रमण आणि गुन्हे माणुसकीविरोधात आहेत, याची नोंद घेतली गेली पाहिजे. यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लक्ष घातले पाहिजे, असे ट्विट शाहिद आफ्रिदीने केले.


दरम्यान आफ्रिदीच्या ट्विटचा भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने खरपूस समाचार घेतला आहे. आफ्रिदीच्या या ट्विटला गौतम गंभीर म्हणाला, आफ्रिदीचा मानवतेविरुद्ध वापरली जाणारी आक्रमकता हा मुद्दा बरोबर आहे. आफ्रिदीचे याबद्दल टाळ्या वाजवून अभिनंदन केले पाहिजे. पण तो एक गोष्ट विसरला आहे ते म्हणजे हे सारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घडत आहे. त्याच्याकडून हे लिहिण्याचे राहून गेले. पोरा, या सगळ्याची काळजी तू करु नको. आम्ही आमचे बघून घेऊ, असा आशयाचे ट्विट केले आहे.

Leave a Comment