खडतर नागद्वारी यात्रा सुरु


मध्यप्रदेशातील होशंगाबाद जिल्हातील पचमढी येथे पावसाळ्यांत दरवर्षी भरणारी नागद्वारी यात्रा सुरु झाली असून ती १० दिवस चालणार आहे. १६ किमीचा दुर्गम पहाडातून जाणारा अतिशय खडतर मार्ग पायी जाऊन भाविक या यात्रेत नागलोकाचे दर्शन घेतात. येथे पूजा अर्चना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असा भाविकांचा विश्वास आहे. ७ दुर्गम पहाड पार करून नागलोक मंदिरात जावे लागते आणि ही यात्रा जगातील सर्वात खडतर मानली जाते कारण या मार्गावर विषारी नाग साप मोठ्या प्रमाणावर आहेत.

श्रावणात दरवर्षी ही यात्रा होते आणि वर्षातील फक्त १० दिवसच हे मंदिर खुले असते. घनदाट जंगल त्यातील उंच आणि अवघड पहाड त्यासाठी ओलांडावे लागतात. नागलोक किंवा नागद्वार अशी याला दोन नावे असून रस्त्यात भाविकांच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केली जाते. खडे डोंगर पार करण्यासाठी काही ठिकाणी शिड्या चढाव्या लागतात. रस्ता अतिशय अरुंद असून अनेक ठिकाणी मोठमोठया शिळा ओलांडाव्या लागतात. नागलोक मंदिरात जाऊन परत येण्यासाठी दोन दिवस लागतात.


नागलोकची गुहा ३५ फुट लांबीची आहे. येथे नागपंचमीला खूप गर्दी होते. सातपुडा व्याघ्र संरक्षित क्षेत्र असल्याने येथे प्रवेश वर्जित आहे. पण वर्षातून एकदा या यात्रेसाठी प्रवेश दिला जातो. नागपंचमीला येथे यात्रा भरते. येथेच चिंतामणी गुहा असून ती १०० फुट लांबीची आहे. येथे नागदेवतेच्या अनेक मूर्ती आहेत. तसेच अर्धा किमीवर स्वर्गद्वार गुहा असून येथेही नागदेवतेच्या अनेक मूर्ती आहेत. पहाडावर चढण्यासाठी सर्पाकार मार्ग असून नागद्वारी यात्रा केल्या कालसर्प दोष दूर होतो असा समज आहे.

गोविंदगिरी पहाडावर मुख्य गुहा असून येथे असलेल्या शिवलिंगाला काजळ अर्पण करण्याची प्रथा आहे. यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात असा विश्वास आहे. पाउस, निसरडी जमीन, दाट जंगल, उंच अवघड पहाड असा हा रस्ता असल्याने ही यात्रा खडतर बनली आहे.

Leave a Comment