“कलम 370 हटवल्याने बाळासाहेब आणि वाजपेयींचे स्वप्न पुर्ण झाले”


गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव सादर केला. याचबरोबर राज्य पुनर्गठन प्रस्ताव देखील सादर करण्यात आला. यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज आपला देश पुर्ण स्वतंत्र झाला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.


आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करताना उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली की, “आज आपला देश पूर्ण स्वतंत्र, विरोधकांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून देशाच्या सार्वभौमत्वाला महत्त्व द्यावं. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद.आज आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला.” उद्धव ठाकरे यांनी मिठाई वाटत या निर्णयाचे स्वागत केले आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या निर्णयावर म्हणाले की, “हा निर्णय घेताना तेथील स्थानिक नेत्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र सरकारने त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतला. ”


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की, “जम्मू-काश्मीरबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात शांतता प्रस्थापित होईल आणि विकास होईल अशी आशा आहे.”


सरकारच्या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील स्वागत केले आहे. “सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. हे जम्मू-काश्मीर सहित संपुर्ण देशासाठी अत्यंत गरजेचे होते. सर्वांनी स्वार्थ बाजूला ठेऊन या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे.”, असे संघाने म्हटले आहे.

तसेच, राज्यसभेत शाह यांनी विधेयक सादर करताच विरोधी पक्षांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. पीडीपीच्या खासदाराने कपडे आणि संविधान फाडत विरोध दर्शवला. तर कॉंग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी, भाजपने संविधानाची हत्या केली असल्याचे म्हटले आहे.


भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या जेडीयूने सरकारचा विरोध केला. तर बीएसपी , बीजेडी, एआईएडीएमके, आम आदमी पार्टी, शिवसेनने सरकारचे समर्थन केले. तसेच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनी देखील सरकारवर टीका केली.
कलम हटवल्याने काय बदल होणार ? 
कलम 370 हटवल्याने आता लद्दाख काश्मीरपासून वेगळे होणार असून, जम्मू-काश्मीर आणि लद्दाख वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश असतील.

तसेच, आधी असलेले दुहेरी नागरिक्त संपेल. तसेच काश्मीरला असलेला स्वतंत्र झेंडा आता राहणार नाही. तसेच आता सर्वाच्च न्यायालयाचा निर्णय जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना मान्य करावा लागणार आहे. तसेच आता केंद्र सरकार कोणताही कायदा आता जम्मू-काश्मीरसाठी लागू करू शकते.

सध्या जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्ष असून, कलम 370 रद्द केल्याने आता हा कार्यकाळ 5 वर्ष होईल.

Leave a Comment