येडीयुरप्पाना दिलेले गिफ्ट महापौरांना पडले महाग


कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा भार नुकताच स्वीकारलेले भाजपचे नेते बीएस येडीयुरप्पा यांना दिलेली सुक्यामेव्याची टोपली बंगलोरच्या महापौर गंगाम्बिक मल्लिकार्जुन यांना महागात पडल्याची चर्चा आहे. झाले असे कि गंगाम्बिका मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या भेटीसाठी काही दिवसांपूर्वी गेल्या तेव्हा त्यांनी सोबत सुका मेवा भरलेली छोटी टोपली नेली. मात्र या टोपलीवर प्लास्टिक कव्हर होते आणि त्याचे फोटो वर्तमानपत्रात, इलेक्ट्रोनिक मिडीयावर येताच महापौरांवर सोशल मिडियामध्ये टीकेची झोड उठली कारण बंगलोर मध्ये २०१६ पासून प्लास्टिक वापरावर बंदी आहे.

महापौर गंगाम्बिका यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी त्वरित शनिवारी वॉर्ड क्रमांक ११०च्या आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ५०० रु. दंड भरला. त्या म्हणाल्या, २०१६ मध्ये राज्यात प्लास्टिक बंदी झाली आहे त्यामुळे मी प्लास्टिक कव्हर असलेली टोपली नेणे ही चूक होती पण ती नकळत घडली. मी शहराची प्रथम नागरिक आहे आणि मला दुसऱ्यांसाठी आदर्श बनले पाहिजे. म्हणून मी चूक झाल्याचा रीतसर दंड भरला आहे त्यामुळे अन्य नागरिक नियमाचे पालन करतील अशी आशा आहे. बंगलोर मध्ये प्लास्टिक उत्पादन, विक्री आणि वापर यावर बंदी असून ती मोडणाऱ्या अनेक नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे.

बंगलोर मध्ये दर महिन्याला ४ हजार टन कचरा निर्माण होतो आणि त्यात २० टक्के प्लास्टिक कचरा असतो. हे प्रमाण कमी करण्यासाठी प्लास्टिक बंदी केली गेली आहे.

Leave a Comment