एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार 150 महिला चालक


मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात अर्थात आपली लाडकी लालपरीमध्ये सध्याच्या घडीला महिला वाहक कार्यरत आहेत. त्यातच आता या महिला वाहकांच्या जोडीला महिला चालकही दाखल होणार आहेत. ‘चालक-वाहक’ म्हणून एसटीकडून केल्या जाणाऱ्या भरतीत 150 महिलांची निवड झाली असून त्यांचे एक वर्ष प्रशिक्षण ऑगस्ट महिन्यापासून होणार आहे. या महिला त्यानंतर एसटीच्या सेवेत दाखल होतील. त्यामुळे आता महिलांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग जाणार आहे.

एसटी महामंडळाची भरती प्रक्रिया सध्या सुरु असून महिलांसाठी यात राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त महिलांचा प्रतिसाद मिळावा यासाठी काही अटींमध्ये बदलही करण्यात आले आहेत. अवजड वाहन परवाना व तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव अशी अट यापूर्वी पुरुष व महिलांसाठी होती. पण अट शिथील करून महिलांसाठी अवजड ऐवजी हलकी वाहने चालवण्याचा एक वर्षांचा परवाना अशी अट ठेवण्यात आली. महिलांनी त्यानुसार अर्ज केले. चालक-वाहक पदासाठी 150 महिला सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पात्र ठरल्या आहेत. अवजड वाहन चालवण्याचा अनुभव त्यांना नसल्याने नियमानुसार त्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्या सेवेत दाखल होतील. या महिला चालकांना प्रथम छोट्या अंतरावरील एसटी चालवण्याचा अनुभव दिला जाईल. त्यानंतर लांब पल्ल्याच्या मार्गावर त्यांची नियुक्ती केली जाईल.

Leave a Comment