‘मिशन मंगल’च्या मराठी व्हर्जनला मनसेचा विरोध


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मराठी चित्रपटांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये हीच भूमिका असून जर मराठीत अक्षयकुमारसह तगडी स्टारकास्ट असलेला ‘मिशन मंगल’ हा चित्रपट डब करण्यात आला तर राज ठाकरे यांच्या मनसेसैनिकांशी गाठ असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. हा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी दिला आहे. त्यांनी आपल्या त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत मराठीत ‘मिशन मंगल’ चित्रपट डब करण्यास तीव्र विरोध केला आहे.


कोणतेही नुकसान मराठी चित्रपटसृष्टीचे होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वचनबद्ध असल्यामुळे मराठी आणि हिंदीत ‘मिशन मंगल’ हा चित्रपट एकाच वेळी चित्रीत करण्यात आला असता तर आम्ही त्याच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला नसता, चित्रपटाशी संबंधित सगळ्या लोकांनी हे ध्यानात घ्यावे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने आजवर मराठी चित्रपटांवर अन्याय होऊ नये यासाठी बॉलिवूडच्या निर्मात्यांना इशारा दिला आहे. पण ते दरवेळी तीच चूक पुन्हा करतात.

मराठीत ‘मिशन मंगल’ हा चित्रपट डब करुन महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येणार असल्यामुळे मराठी सिनेसृष्टीचे दुहेरी नुकसान होणार आहे. हा डब चित्रपट मराठी चित्रपटासाठीच्या खेळाच्या वेळा लाटणार असल्यामुळे प्राईमटाईमचे शो मराठी चित्रपटांना मिळणार नाहीत. दुसरीकडे मराठी कलावंत-अभिनेते यांच्याशिवाय एखादा चित्रपट मराठीत प्रदर्शित करुन पैसे कमावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. असे झाल्यास मराठी सिनेसृष्टीचे नुकसानच होईल. याच अनुषंगाने आम्ही हा चित्रपट डब करण्यास विरोध दर्शवला आहे असे मनसेने म्हटले आहे.

Leave a Comment