मनसेच्या विरोधानंतर अवघ्या दोन तासातच अक्षय कुमारची माघार


आपला आगामी मिशन मंगल हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी मराठीत देखील डब करुन रिलीज करण्याची घोषणा कालच अक्षय कुमारने केली होती. पण फेसबुक लाईव्हमधून त्याला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी विरोध करताच दोन तासांत अक्षय कुमारने माघार घेतल्याचे जाहीर केले.

आतापर्यंत मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळवण्यासाठी आम्ही आंदोलन करत आलो. आता तुकडा पाडण्याची वेळ आली आहे. अक्षय कुमार यांचा ‘मिशन मंगल’ हा १५ ऑगस्टला जगभरात हिंदीत रिलीज होणार आहे, पण तो महाराष्ट्रात हिंदीसह मराठी भाषेतही रिलीज होणार आहे. आमचा विरोध हिंदी भाषेतील ‘मिशन मंगल’ला नाही, पण हा चित्रपट मराठीत डब करण्यामागे फार मोठे षडयंत्र आहे. इतर भाषेतील चित्रपट जर मराठीत डब करणार असाल, तर मराठी सिनेसृष्टीने काय करायचे ? असा प्रश्न अमेय खोपकर यांनी उपस्थित केला.

येत्या काही दिवसांत मनचिकसे इतर भाषेतील चित्रपट मराठीत डब करण्याविरोधात मोठे आंदोलन उभे करेल. यावर योग्य ती कारवाई सरकारने केली नाही, तर चित्रपटगृहांच्या काचा फुटतील. ते चित्रपटगृहांच्या मालकांनाही परवडणार नाही. मराठीत ’मिशन मंगल’ हा चित्रपट डब करण्यापेक्षा कलाकारांसोबत रिशूट करा. आमचा त्याला विरोध नाही. आमचा केवळ मराठीत डब करून रिलीज करायला विरोध आहे. जर मराठीत डब करून ‘मिशन मंगल’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित केला, तर हिंदी चित्रपटही रिलीज होऊ देणार नाही, असे खोपकर यांनी फेसबुक लाइव्हद्वारे स्पष्ट केले.

मिशन मंगल मराठीत डब करून प्रदर्शित करण्याला खोपकर यांनी विरोध करताच अक्षय कुमारने दोन तासांत आपला निर्णय बदलला. मिशन मंगल मराठीत डब करून प्रदर्शित होणार नसल्याचे त्याने जाहीर केले.

Leave a Comment