केनेडी परिवारात आणखी एक गूढ मृत्यू


अमेरिकेच्या राजकीय घराण्यात आजही केनेडी परिवार आपले जनमानसाच्या मनात असलेले मानाचे स्थान राखून आहे. मात्र या घराण्यातील १३ सदस्यांना आकस्मिक मृत्यू आल्याने हा परिवार मृत्यू शापित मानला जातो. माजी अध्यक्ष जॉन एफ केनेडी याचा भाऊ रोबर्ट यांची नात साओर्स केनेडी हिचा नुकताच असाच गूढ मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा केनेडी परिवार चर्चेत आला आहे. औषधांच्या ओव्हरडोस मुळे साओर्स मरण पावली असे सांगितले जात आहे.

गेल्या ७५ वर्षात या घराण्यातील १३ लोकांचे आकस्मिक रहस्यमय मृत्यू झाले आहेत. साओर्सच्या मृत्यूने या आठवणीना उजाळा मिळाला आहे. अमेरिकन राजकारणावर आजही प्रभाव असलेल्या या घराण्याचे प्रमुख जोसेफ आणि रोज यांना ९ मुले. सर्वात मोठा जोसेफ ज्युनिअर वायुसेनेत पायलट होता. दुसऱ्या महायुद्धात युरोप मध्ये तो एका गुप्त कामगिरीवर गेला असता त्याच्या विमानाला आग लागून त्याचा मृत्यू झाला. दुसरा मुलगा जॉन राजकारणात आला आणि अमेरिकेचा सर्वात लोकप्रिय अध्यक्ष बनला पण त्यांची २२ नोव्हेंबर ६३ साली गोळ्या घालून हत्या केली गेली. जोसेफची मुलगी कॅथलीन १९४८ मध्ये फ्रांस येथे विमान अपघातात ठार झाली.

जॉन केनेडी यांच्चा धाकटा भाऊ रोबर्ट यांचीही १९६८ साली हत्या झाली. त्यावेळी ते अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीच्या तयारीत होते. १९८४ मध्ये रोबर्ट यांचा मुलगा डेव्हिड ड्रग्जच्या ओव्हरडोस मुळे मृत्यू पावला तर त्यांचा दुसरा मुलगा मायकल १९९९ साली स्कीईंग करताना अपघात होऊन गेला. जॉन केनेडी याचा मुलगा जॉन ज्युनिअर विमान अपघातात ठार झाला तर बहिण रोजमेरी मेंदू विकाराने मरण पावली. केनेडी कुटुंबातील सर्वात धाकटा टेड अपघातातून वाचला आणि त्यानंतर ५० वर्षे सिनेटर होता तो २०११ मध्ये ब्रेन कॅन्सरनी गेला तर त्याची मुलगी कारा जिम मध्ये वर्कआउट करताना २०१२ मध्ये अचानक मृत्यू पावली. रोबर्ट ज्युनिअरची पत्नी मेरीचा संशयास्पद मृत्यू झाला आणि आता त्यांची नात साओस हिचाही गूढ मृत्यू झाला आहे.

Leave a Comment