उंचीमुळे मिळाले नव्हते अ‍ॅडमिशन, आता 3 फूट उंची असलेला गणेश बनणार डॉक्टर


परिक्षेत पास होऊन देखील, केवळ उंची कमी असल्याच्या कारणामुळे गणेश विठ्ठलभाई बारैया या विद्यार्थ्याला एमबीबीएसला  मिळाले नव्हते. मात्र स्वतःच्या हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढत त्याने विजय मिळवला आहे.

गणेशला एनईईटी परिक्षा – 2018 मध्ये 223 गुण मिळून देखील मेडिकल कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन देण्यात आले नव्हते. याचे कारण होते त्याची उंची. त्यावेळी त्याचे वजन 14 किलो होते. त्याला कोणत्याच कॉलेजमध्ये अडमिशन मिळाले नाही. त्याला 12 वी (विज्ञान) परिक्षेमध्ये 87 टक्के मिळाले आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अखेर या हुशार विद्यार्थ्याच्या हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवला. तेथे निकाल हा गणेशच्या बाजूने लागला.

तीन फूट उंची असलेल्या गणेश विठ्ठलभाई बारैयाचा गुरूवारी गुजरातच्या भावनगर येथील मेडिकल कॉलेजमध्ये पहिलाच दिवस होता. पहिल्या वर्षाच्या कॉन्फरंस हॉलमध्ये तो पहिल्या रांगेमध्ये बसलेला दिसला. मात्र याठिकाणी पोहचण्यासाठी मोठी कायदेशीर लढाई लढवावी लागली. जेव्हा त्याला ही डिग्री मिळेल त्यावेळी सर्वात कमी उंचीचा असल्यामुळे त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले जाईल.

गणेशने सांगितले की, त्याचा पहिला दिवस चांगला होता. सर्वच मित्रांनी आणि डॉक्टरांनी माझे आनंदाने स्वागत केले. मला आज चांगले वाटते आहे. कारण येथे पोहचण्यासाठी मला दोन ठिकाणी लढाई लढवावी लागली. मी सर्वांचे आभार मानतो, कारण त्यांच्याशिवाय मी माझे स्वप्न पुर्ण करू शकलो नसतो.