झोमॅटोची ‘ती’ ऑर्डर रद्द करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पाठवली नोटीस


नवी दिल्ली – मध्य प्रदेश पोलिसांनी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय हिंदू नसल्याने ऑर्डर रद्द करणाऱ्या अमित शुक्ला नावाच्या व्यक्तीला नोटीस पाठवली आहे. या प्रकारचे टि्वट पुन्हा करू नका, असे येत्या सहा महिन्यांच्या आतमध्ये टि्वट केल्यास तुरुंगात जावे लागेल, असे नोटीसीद्वारे बजावले आहे.

अमित शुक्ला यांना जबलपूर पोलीस अधीक्षक अमित सिंह यांनी नोटीस पाठवली आहे. पुन्हा संविधानाच्या विरूद्ध टि्वट केल्यास कारवाई होईल, असे त्यांनी म्हटले आहे. अमित शुक्ला या व्यक्तीने डिलिव्हरी बॉय हिंदू नसल्यामुळे झोमॅटोला आर्डर रद्द करण्यास सांगितली होती. माझी आर्डर एका हिंदू नसलेल्या डिलिव्हरी बॉयने दिली आहे. डिलिव्हरी बॉय बदलणे शक्य नसून मी आर्डर रद्द केल्यास पैसे परत मिळणार नसल्याचे झोमॅटो कंपनीने सांगितले. तुमच्याकडे जेवण घेऊन कोणता डिलिव्हरी बॉय येईल याची सक्ती तुम्ही करु शकत नाही. पैसे परत करू नका. माझी आर्डर रद्द करा, असे ट्विट अमित शुक्लाने केले होते.

यावर झोमॅटोने अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म असतो, असे कौतुकास्पद उत्तर दिले. या उत्तरामुळे झोमॅटोवर कौतुकांचा वर्षाव झाला आहे. भारताच्या मूळ संकल्पनेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमच्या ग्राहकांच्या आणि भागीदारांच्या विविधतेचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही व्यवसाय करताना मूल्ये पाळतो. त्यामुळे आमच्या मूल्यांच्या आड येणारा व्यवसाय गमावल्याबद्दल आम्हाला दु:ख वाटत असल्याचे झोमॅटोचे संस्थापक दिपिंदर गोयल यांनी ट्विट करत शुक्ला यांच्या टि्वटला उत्तर दिले.

Leave a Comment