जेफ बेजोस रिलायंस रिटेलमध्ये २६ टक्के स्टेक घेणार


जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस त्यांच्या इ कॉमर्स अमेझॉन साठी भारतातील सर्वात बडी रिटेलर कंपनी रिलायंस रिटेल मध्ये २६ टक्के स्टेक घेणार असल्याचे उद्योग जगतातील दोन बड्या अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले आहे. भारताचे सर्वात बडे उद्योजक आणि आशियातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी याच्या बरोबर या संदर्भात बेजोस चर्चा करत असल्याचेही समजते. रिलायंस आणि अमेझॉन कंपनी प्रवक्त्यांनी मात्र या संदर्भात मौन बाळगले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रिलायंस रिटेलने बिझिनेस स्टेक विक्रीसाठी चीनची बलाढ्य इ कॉमर्स कंपनी अलिबाबा ग्रुप सोबत चर्चा केली होती मात्र व्हॅल्युएशन वर सहमती होऊ न शकल्याने हा करार होऊ शकला नाही. दुसरीकडे अमेझॉन भारताच्या सर्वात मोठ्या ब्रिक अँड मोर्टार चेन मध्ये भागीदारी घेण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्नशील आहे. यामागचे कारण म्हणजे भारतात आजही ग्राहक प्रत्यक्ष आउटलेट मध्ये जाऊन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. रिलायंस रिटेलशी भागीदारी केल्यास अमेझॉन अनेक चॅनल्सच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचू शकणार आहे.

रिलायंस प्रवक्त्याने या संदर्भात कंपनी वेगवेगळ्या संधी वेळोवेळी तपासून पाहत असल्याचे सांगितले. कंपनी कर्ज कमी करण्यासाठी परदेशी भागीदार शोधू शकेल असे संकेत त्यांनी दिले. अन्य स्रोताकडून मिळालेल्या माहितीनुसार अमेझॉन रिलायंसबरोबर डील करताना फेब्रुवारीत केंद्र सरकारने लागू केलेल्या इ कॉमर्स परदेशी गुंतवणूक नियमानुसार करेल. त्यानुसार २६ टक्के स्टेक घेतला तर रिलायंस रिटेलच्या प्लॅटफॉर्मवर अमेझोन सेलर बनू शकणार आहे.

Leave a Comment