ट्रिपल तलाक विधेयकावर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब


नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बहुचर्चित तिहेरी तलाक विधेयकावर शिक्कामोर्तब केले आहे. ट्रिपल तलाक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये अनेक वादविवादानंतर पारित झाल्याने आता ‘मुस्लीम महिला सुरक्षा कायदा २०१९’ अस्तित्त्वात आला असल्यामुळे तलाक देण्याच्या प्रथेवर आता तात्काळ बंदी आली आहे.

विधेयक लोकसभेमध्ये बहुमताने पास झाल्यानंतर बहुमत नसतानाही राज्यसभेमध्ये भाजपला विधेयक मंजूर करता आले. विधेयकाच्या बाजूने राज्यसभेमध्ये ९९ मते पडली, तर विरोधात ८४ मते पडली. मुस्लिम महिलांना दोन्ही सभागृहांनी न्याय दिला आहे. हा एक ऐतिहासिक दिवस आहे, असे कायदामंत्री रविशंकर प्रसाद राज्यसभेत कायदा मंजूर झाल्यावर म्हणाले.

अधिक सविस्तर पडताळणीसाठी तिहेरी तलाक विधेयक संसदीय समितीकडे सोपविण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. विरोधकांचा तलाक देणाऱ्या पतीला ३ वर्ष शिक्षेच्या तरतुदीवर आक्षेप असल्यामुळे कायद्याचा गैरवापर होऊ शकतो, असे विरोधकांचे म्हणणे होते. पण विधेयकाच्या मंजुरीवेळी अनेक पक्षांनी मतदानावर बहिष्कार घातला किंवा गैरहजर राहिले. त्यामुळे विधेयक मंजूर होण्यात विरोधकांची अप्रत्यक्षपणे मदतच झाली.

Leave a Comment