या चिमुरड्याच्या तोंडातून डॉक्टरांनी काढले तब्बल ५२६ दात


एका ७ वर्षांच्या मुलाच्या तोंडातून शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तब्बल ५२६ दात बाहेर काढले आहेत. या मुलाचे नाव रविंद्रन असे आहे. ही शस्त्रक्रिया सविता दंतवैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली. आश्चर्यकारकरीत्या ५२६ दात त्याच्या तोंडात आले होते. यामुळे त्या मुलाचा खालचा जबडा सुजला होता. ‘कंपाऊंड कॉम्पोझिट अॅडोन्टोमा’ हा अत्यंत दुर्मिळ आजार त्याला झाला होता.

११ जुलैला ही शस्त्रक्रिया रविंद्रन याच्यावर झाल्यानंतर ३ दिवस त्याला रुग्णालयात रहावे लागले. या शस्त्रक्रियेची माहिती डॉ. सेंतिलनाथन यांनी दिली. रुग्णालयात रविंद्रन याला आणले तेव्हा त्याचा खालचा जबडा सुजला होता. त्याचे सीटी स्कॅन आणि रेडिओग्राफ केल्यानंतर त्याच्या जबड्यात अनेक कठीण वस्तू असल्याने त्याच्या जबड्याला मोठी दुखापत झाल्याचे निदर्शनास आले होते. हा ट्युमर असल्यासारखे आम्हाला वाटले.

आम्ही त्याची बायॉप्सी करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जबड्याची आम्ही पुनर्रचना करावी किंवा या ट्युमरवर उपचार करून जबडा वाचवावा, असा विचार केला होता. अखेर आम्ही यातील दुसऱ्या प्रकाराचा अवलंब केला आणि यामध्ये जबड्याला दुखापत झाल्यास त्याची पुनर्रचना करावी, असे ठरवले. मात्र, प्रत्यक्षात ज्याला ट्युमर किंवा गाठ समजले जात होते, त्या भागातून ५२६ छोटे-छोटे दात बाहेर काढण्यात आले.

तब्बल २ तास ही शस्त्रक्रिया चालली. एकाच व्यक्तीच्या तोंडात एवढे दात सापडण्याची ही वैद्यकीय क्षेत्रातील जगभरातील पहिलीच घटना असल्याचेही डॉ. सेंतिलनाथन यांनी सांगितले. सर्वसाधारण भूल देऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Comment