साध्वी प्रज्ञासिंह यांच्या करकरेंच्या बाबतच्या वक्तव्याचे संघांच्या नेत्याकडून समर्थन


नवी दिल्ली – महाराष्ट्र राज्य दहशतवादीविरोधी पथकाचे माजी प्रमुख शहिद हेमंत करकरे यांच्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी इंद्रेश कुमार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या करकरे यांच्याबद्दल बोलताना करकरे यांना श्रद्धांजली अर्पण करु शकतो पण त्यांचा आदर करु शकत नसल्याचे मत कुमार यांनी व्यक्त केले आहे. आपल्या वक्तव्यामधून कुमार यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या करकरेंबद्दलच्या भूमिकेला एकप्रकारे पाठिंबाच दिला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर पोलिसांचा वापर करुन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने अत्याचार केल्याचा आरोप कुमार यांनी केली आहे. एका दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या हेमंत करकरे यांना श्रद्धांजली अर्पण करता येईल. पण त्यांचा सन्मान करता येणार नाही. त्यांच्या बलिदानाचा आदर आहे, पण त्यांनी केलेल्या अतिरेकाकडे दूर्लक्ष करता येणार नसल्याचे मत कुमार यांनी व्यक्त केले आहे.

ही गोष्ट आपल्या सर्वांना स्वीकारायला हवी की या वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मानवतावादी दृष्टीकोनातून करकरेंबद्दलचे आपले मत बदलले, असे मतही संघाचे कार्यकारी सदस्य असणाऱ्या कुमार यांनी व्यक्त केले. हा मुद्दा प्रसारमाध्यमांनी वाढवला आणि अनेक प्रश्न त्यांच्या वक्तव्यावरुन उपस्थित केले. या प्रकरणामध्ये प्रसारमाध्यमांच्या भूमिकेमागे एखादा अजेंडा आहे की काय असा प्रश्न पडला होता, असा आरोपही कुमार यांनी प्रसारमाध्यमांवर केला.

Leave a Comment