10 ऑगस्टला विरोधी पक्षातील बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश


मुंबई – महाराष्ट्रातील राजकारण मागील अनेक दिवसांपासून भाजपमधील विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे ढवळून निघाला आहे. सत्ताधारी भाजप पक्षात विरोधी पक्षातील अनेक नेते प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ, मधुकर पिचड, वैभव पिचड, संदीप नाईक अशा विरोधी पक्षातील नेत्यांना 31 जुलै रोजी भाजपत प्रवेश देण्यात आला. यानंतर आता पुन्हा एकदा 10 ऑगस्टला भाजपमध्ये विरोधी पक्षातील बड्या नेत्यांचा प्रवेश होणार आहे.

आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात ही यात्रा मराठवाडा आणि विदर्भात जाणार असल्यामुळे भाजपमध्ये मराठवाडा-विदर्भातील अनेक बडे नेते प्रवेश करणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील.

भाजपने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पहिल्या टप्प्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. राष्ट्रवादीतून आमदार वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे, संदीप नाईक तसेच काँग्रेसमधून बाहेर पडलेले कालिदास कोळंबकर यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला होता. शिवेंद्रसिंहराजे साता-यातील जावळीचे, पिचड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोळंबकर मुंबईतील वडाळा तसेच संदीप नाईक हे नवी मुंबईतील ऐरोलीचे आमदार आहेत.

Leave a Comment