मैत्री ही माणसाला मिळालेली अमोल देणगी आहे. मित्रांशिवाय आयुष्य ही कल्पना करणे अवघड. या मैत्रीची आठवण जपणारा फ्रेंडशिप डे दरवर्षी जगभर साजरा केला जातो. भारतात तो ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा करण्याची प्रथा पडली असून यंदा हा उत्सव ४ ऑगस्टला साजरा होईल. ही प्रथा भारतीय नाही तर ती परदेशातून आपल्याकडे आली आहे. पण भारतातही हा उत्सव एन्जॉय केला जातो. लहान मुलांमध्ये आणि तरुणाईत त्याची अधिक क्रेझ आहे. या निमित्ताने बाजार विविध भेटवस्तू, फ्रेन्डशिप बँड, ग्रीटींग्सने सजतात. यंदाही ते तसे सजले आहेत.

सोशल नेटवर्क साईट्सवर आता फ्रेन्डशिप डे चे फोटो शेअर होतील, शुभेच्छांच्या सरी बरसतील. पण या दिवसाचा नक्की उगम कुठे झाला याची अनेकांना माहिती नसेल. सर्वप्रथम १९३५ मध्ये अमेरिकन कॉंग्रेसने १ ऑगस्टला पहिला रविवार होता तेव्हा या दिवसाला फ्रेंडशिप डे म्हणून घोषित केले असा दावा केला जातो. त्यानंतर दरवर्षी वार्षिक उत्सव म्हणून तो साजरा केला जावा म्हणून वर्ल्ड फ्रेन्डशिप डे मोहीम सुरु झाली आणि ३० जुलै १९५८ ला संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर तो साजरा केला जावा असा प्रस्ताव मांडला गेला.

यानंतर अनेक देशात तो विधिवत साजरा होऊ लागला. २७ एप्रिल २०११ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेम्ब्ली मध्ये तो दरवर्षी साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली गेली. प्रत्येक देशात तो वेगळ्या तारखेला साजरा होतो. कुठे तो २० जुलै रोजी, कुठे ३० जुलै रोजी हा दिवस साजरा होतो. भारतात तो ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

आपल्या चांगल्या वाईट दिवसात आपली साथ करणाऱ्या आपल्या खास मित्राची आठवण या निमित्ताने ठेवायची हाच या दिवसाचा उद्देश.

Leave a Comment