लाईटमनने वाहतूक पोलिसाला शिकविला उलटा पाठ


नियमाचे पालन सर्वांनी केले पाहिजे या बाबत दुमत असण्याचे कारण नाही. पण कधी कधी नियमाचे पालन करण्याच्या या नेक प्रयत्नात वेगळाच धडा शिकायला मिळतो याचा अनुभव फिरोजाबाद येथील एका वाहतूक पोलिसाला आला.

झाले असे की, या फिरोजाबादच्या लेबर कॉलनीत सब स्टेशनवर तैनात असलेला एक लाईटमन फॉल्ट जोडणी करण्यासाठी मोटारसायकलवरून जात होता तेव्हा त्याने हेल्मेट घातले नव्हते. रस्त्यातील वाहतूक पोलिसाने त्याला अडविले तेव्हा त्याने फॉल्ट दुरुस्तीसाठी जात असल्याचे सांगितले पण पोलिसाने काही एक ऐकून न घेता त्याचे चलन फाडले. लाईनमनने हा प्रकार त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कानावर घातला. पोलिसाने त्यावर त्या अधिकाऱ्यालाच वाहतुकीचे नियम सांगितले.

पोलिसाने लाईटमन आणि त्यानिमित्ताने वीज मंडळाला शिकविलेला हा धडा पोलीस विभागाला चांगलाच महागात पडला. कारण लाईटमनने चलन केल्याची तक्रार करताच वीज मंडळातील अधिकाऱ्यांनी वीज बिल बाकी असलेल्याची यादी तपासली तेव्हा त्यात या पोलीस ठाण्याच्या नावावर ६२,४६३ रुपये बाकी असल्याचे दिसले. वीज मंडळाने ताबडतोब याच लाईनमनला पोलीस ठाण्याचा वीज पुरवठा तोडण्याचे आदेश दिले. पोलीस ठाण्यातून वीज तोडल्याचा फोन वीज अधिकाऱ्याकडे आला तेव्हा त्यांनीही वीज बाकीच्या नियमानुसार वीज तोडल्याचा धडा पोलिसांना दिला. रात्रभर या पोलीस स्टेशनची वीज गायब होती असे समजते.

Leave a Comment