भारतात येतेय पोर्शेची इलेक्ट्रिक कार टेकन


पोर्शे भारतीय ऑटो बाजारात मे २०२० मध्ये त्यांची इलेक्ट्रिक कार टेकन सादर करणार आहे. सोमवारी पोर्शेची फेसलिफ्ट मॅकन एसयुव्ही लाँच केली गेली तेव्हा पोर्शे इंडियाचे डायरेक्टर पवन शेट्टी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले टेकन ४ मिनिटांच्या चार्जिगवर १०० किमी अंतर कापू शकेल. जागतिक स्तरावर टेकन सप्टेंबर मध्ये लाँच केली जात असून भारतात ती मे २०२० मध्ये येईल. ही कार भारतात इंपोर्ट केली जाणार आहे.

या कारला ८०० व्होल्ट आर्किटेक्चरवर तयार केले गेले आहे. ४ मिनिट चार्जिंगवर ती १०० किमी धावेल तर फुलचार्ज केल्यावर ५०० किमी अंतर तोडेल. नवीन जनरेशन बॅटरी टेक्नोलॉजी वापरात आली की हीच कार फुलचार्ज केल्यावर १ हजार किमी अंतर कापण्यास सक्षम असेल. अर्थात हे नवे तंत्रज्ञान अजून प्रायोगिक अवस्थेत असून ती उपयोगात येण्यास कदाचित काही वर्षे वाट पहावी लागणार आहे. या तंत्रज्ञानामुळे चार्जिंगचा वेळ कमी होणार आहे.

शेट्टी म्हणाले, भारत सरकारने इलेक्ट्रिक कारवर १२ टक्क्याऐवजी ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे हा इलेक्ट्रिक कार उत्पादकांसाठी चांगला निर्णय आहे. पोर्शे इंडियाने ग्राहकांना इलेक्ट्रिक कार चार्जीग सुविधा देण्यासाठी स्थानिक पंचतारांकित हॉटेल्सबरोबर करार केला आहे. गेल्या काही महिन्यात भारतीय बाजारात ऑडी, बीएमडब्ल्यू या बड्या कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कार सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आता पोर्शेची टेकन सामील होत आहे.

Leave a Comment