ऑगस्टमध्येच पाहता येणार स्टॅच्यु ऑफ बिलिफ?


भारतात सध्या श्रावण महिना सुरु असून या महिन्यात शिवभक्तीला विशेष प्राधान्य दिले जाते. देशातील सर्व शिवमंदिरात या निमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चना होत असतात. शिव भक्तांना यंदा शिवाच्या आणखी एका महाप्रचंड स्वरूपाचे दर्शन होण्याची शक्यता आहे. राजस्तानच्या नाथद्वार या पवित्र तीर्थस्थळाजवळ गणेश टेकडीवर जगातील सर्वात मोठी शिव प्रतिमा साकारली जात असून हे काम ऑगस्ट मध्ये पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या शिव प्रतिमेला स्टॅच्यु ऑफ बिलिफ म्हणजे विश्वासाचा पुतळा असे नाव दिले गेले आहे.

राजस्थानच्या उदयपुर शहरापासून ५० किमीवर हे ठिकाण आहे. गणेश टेकडीवर ही महाप्रचंड शिवप्रतिमा साकारण्यासाठी २५०० टन रिफाईड स्टीलचा वापर केला गेला असून त्यावर उच्च प्रतीच्या तांब्याने चमक आणली गेली आहे. ही शिवप्रतिमा ३५१ फुट उंच असून प्रेक्षकांसाठी २०, १०० आणि २७० फुट उंचीवर गॅलरिज बांधल्या गेल्या आहेत. तेथे लिफ्टची सुविधा आहे तसेच आसपास सर्व प्रकारच्या सुविधा येणाऱ्या लोकांना मिळणार आहे.

स्टॅच्यु ऑफ बिलिफ ही जगातील चौथी प्रचंड मूर्ती असून तिथे असाच प्रचंड आकाराचा नंदीही बनविला जात आहे. ही मूर्ती २० किमी लांब असलेल्या कंकरोली फ्लायओव्हर वरूनही दिसणार आहे. रात्री ती स्पष्ट दिसावी म्हणून विशेष प्रकारचे लाईट लावले जाणार असून ते अमेरिकेतून आणले गेले आहेत. स्टॅच्यु ऑफ युनिटी, चीनचा स्प्रिंग टेम्पल बुद्ध, म्यानमारचा लेक्यून सेत्कार या जगातील अन्य प्रचंड मोठ्या मूर्ती आहेत.

Leave a Comment