असा आहे विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांचा जीवनप्रवास


आज (मंगळवार) भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अझीम प्रेमजी निवृत्त होत असून ते विप्रोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असून, आता कंपनीची धुरा त्यांचा मुलगा रिषद प्रेमजी सांभाळणार आहे. मुंबईतील एका गुजराती मुस्लिम कुटुंबात 24 जुलै 1945मध्ये अझीम प्रेमजी यांचा जन्म झाला. मूळचे खान्देशातील अमळनेरचे अझीम प्रेमजींचे कुटुंबीय आहेत. तिथे वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रॉडक्टस् या नावाने सनफ्लॉवर खाद्यतेलाचा कारखाना त्यांचे वडील मुहंमद हाशिम प्रेमजी यांनी टाकला होता व ते 787 या नावाच्या कपडे धुण्याच्या साबणाचाही उद्योग करत होते.

अमेरिकेत स्टॅनफोर्ड विद्यापीठात 1966 साली अझीम प्रेमजी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग शिकत असतानाच वडिलांच्या मृत्यूची बातमी त्यांना कळली व ते शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतले. ते त्यावेळी 21 वर्षांचे होते. पुढे त्यांनी प्रॉडक्टस्, पारंपरिक साबण, बेबी केअर प्रॉडक्टस्, सौंदर्य प्रसाधने यांची भर घालून व्यवसायाचा विस्तार केला. संगणक युग येणार अशी चर्चा 1980 साली सुरू झाली, अझीम प्रेमजी यांनी त्यावेळी कॉम्प्युटरचे महत्त्व अचूक दूरदृष्टीने हेरले व त्या व्यवसायात प्रवेश करायचे ठरवले. आयबीएम ही बलाढ्य संगणक कंपनी त्याचवेळी भारत सोडून अमेरिकेत गेली होती. अझीम प्रेमजींनी त्याचा फायदा उठवत ‘विप्रो’ डेस्कटॉप कॉम्प्युटर्स भारतात सादर केले. त्यांनी लवकरच अमेरिकेच्या सेंटनिल कॉम्प्युटर कॉर्पोरेशनबरोबर करार केला आणि उन्नत प्रकारचे कॉम्प्युटर सॉफ्टवेअरही बनवायला सुरुवात केली. विप्रो ही आज जगातली बलाढ्य कॉम्प्युटर कंपनी म्हणून ओळखली जाते.

अझीम प्रेमजींची साबण ते सॉफ्टवेअर किंग अशी ही यशोगाथा आहे. यास्मीन यांच्याशी अझीम प्रेमजींचा विवाह झाला असून, रिषद व तारीक ही दोन मुले त्यांना आहेत. विप्रोच्या माहिती-तंत्रज्ञान विभागात चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर म्हणून रिषद सध्या काम करतो. बिझनेस वीकने ग्रेटेस्ट एंटरप्रेन्युअर हा पुरस्कार अझीम प्रेमजी यांच्या या कामगिरीसाठी त्यांना दिला आहे, तर मणिपाल विद्यापीठाने 2000 साली त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली. त्यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंगने लक्ष्य बिझनेस व्हिजनरी तर कनेक्टिकट विद्यापीठ व म्हैसूर विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट दिल्या आहेत. 2005मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व 2011 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Leave a Comment