9 रुपयांची चुक बस कंडक्टरला पडली 15 लाखांना!


अहमदाबाद : एक लहान चूक गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या अंतर्गत काम करणाऱ्या एका बस कंडक्टरला भारी महागात पडली आहे. या कंडक्टरला एका बस प्रवाशाला तिकीट न देता फक्त 9 रुपये चुकीच्या पद्धतीने कमावल्याप्रकरणी आपल्या पगारातून जवळपास 15 लाख रुपयांचा फटका बसणार आहे.

या कंटक्टरचे नाव चंद्रकांत पटेल असे असून त्याच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने पैसे कमवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यासाठी राज्य परिवहन मंडळाने चौकशी समिती नेमली होती. चंद्रकांत पटेल या समितीच्या चौकशीत दोषी आढळल्यानंतर चंद्रकांत पटेल यांना राज्य परिवहन मंडळाने दंड म्हणून सध्याच्या पगारातील दोन स्टेज कमी केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पे-स्केल भरपूर कमी झाला आहे. तसेच, एका निर्धारित पगारावर त्यांनी आपली बाकीची सर्व्हिस पूर्ण करावी, असे राज्य परिवहन मंडळाने म्हटले आहे.

हे प्रकरण 2003 मध्ये समोर आले होते. चंद्रकांत पटेल यांच्या बसमध्ये 2 जुलै 2003 साली अचानक बस निरीक्षण करतेवेळी एक प्रवाशाकडे तिकीट नसल्याचे आढळून आले. प्रवाशांने त्यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले की, कंडक्टरला 9 रुपये दिले होते. पण त्यांनी तिकीट दिले नाही. अधिकाऱ्यांनी यानंतर कंटक्टर चंद्रकांत पटेल यांच्याविरोधात विभागीय चौकशी नेमली होती.

जवळपास एक महिन्यानंतर याप्रकरणी कंडक्टर चंद्रकांत पटेल दोषी आढळल्यानंतर दंड म्हणून त्यांच्या पगारातून कपात करण्यात आली. चंद्रकांत पटेल यांनी आधी याविरोधात औद्योगिक न्यायाधिकरणकडे धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पण दंडाची शिक्षा दोन्ही न्यायालयात कायम ठेवत त्यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

दरम्यान, चंद्रकांत पटेल यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात सांगितले की, चंद्रकांत पटेल यांना दिलेली दंडाची शिक्षा मोठी आहे. संपूर्ण सर्व्हिस पाहिली तर चंद्रकांत पटेल यांना जवळपास 15 लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. तर, दुसरीकडे राज्य परिवहन मंडळाच्या वकिलाने सांगितले, याआधी जवळपास 35 वेळा आपल्या कामकाजात चंद्रकांत पटेल यांनी चुका केल्या आहेत. अनेकदा त्यांना सामान्य दंड आणि सूचना देण्यात आली आहे.

Leave a Comment