मॅन व्हर्सेस वाइल्डच्या खास एपिसोडमध्ये मोदी यांचा सहभाग


डिस्कव्हरी चॅनलवर गेली काही वर्षे तुफान लोकप्रिय ठरलेल्या मॅन व्हर्सेस वाइल्ड कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दर्शन १२ ऑगस्ट रोजी रात्री ९ वा. होणार आहे. कुठेही राहू शकणारा आणि काहीही खाऊ शकणारा मॅन व्हर्सेस वाइल्डचा हिरो बेअर ग्रील्स सोबत मोदी या खास एपिसोड मध्ये सहभागी झाले असून या भागाचे चित्रण भारतातील सर्वात जुन्या जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानात झाले आहे. डिस्कव्हरीने त्याचे टीझर जारी केले असून बिअर ग्रील्सने मोदींसोबतचे काही फोटो त्याच्या ट्विटर हँडल वर शेअर केले आहेत.


इंटरनॅशनल टायगर डेच्या निमित्ताने हा कार्यक्रम डिस्कव्हरीवर दाखविला जाणार आहे. टीझर मध्ये १८० देशातील नागरिक मोदींच्या अज्ञात गुणांशी परिचित होणार असल्याचे म्हटले गेले असून भारतीय वन्यजीवन कसे आहे. त्यात परिवर्तन करण्याचे काम कसे सुरु आहे हे या कार्यक्रमात दाखविले जाणार आहे. ट्विटरवर फोटो प्रसिध्द होताच त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही डिस्कव्हरीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यांनी त्यावेळी वातावरण बदल आणि जंगली जीव या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली होती.

Leave a Comment