५२ नगरसेवकांसह भाजपच्या वाटेवर गणेश नाईक ?


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे नेते अशी ओळख असलेले गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांची बैठकही यासाठी नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावली आहे. भाजप प्रवेशाच्या निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह आहेत. असे घडले तर राष्ट्रवादीसाठी हा आणखी एक मोठा धक्का ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत सचिन अहिर यांनी प्रवेश केल्यानंतर भाजपच्या वाटेवर चित्रा वाघही आहेत. त्यानंतर आता तिसरा मोठा धक्का राष्ट्रवादीला बसण्याची चिन्ह आहेत.

रविवारी गणेश नाईक यांची भेट घेऊन भाजपत प्रवेश करा, अशी मागणी ठाणे तसेच नवी मुंबई महापालिकेतील काही नगरसेवक तसेच ठाणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी केली. त्यानंतर घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारास ठाणे लोकसभा मतदारसंघातील बेलापूर विधानसभा मतदारसंघात ४० हजार मतांनी पिछाडीवर राहावे लागले. आनंद परांजपे हे ऐरोली या संदीप नाईक यांच्या मतदारसंघातही ४५ हजार मतांनी मागे होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीत राहिलो तर आपले काही खरे नाही असे बहुतांश नगरसेवकांचे मत आहे. आता गणेश नाईक काय निर्णय घेणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment