८ ऑगस्ट रोजी भारतरत्न पुरस्कारने होणार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा गौरव


नवी दिल्ली : येत्या ८ ऑगस्ट रोजी भारतरत्न पुरस्काराने प्रणव मुखर्जी, दिवगंत नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना गौरविण्यात येणार आहे.

येत्या ८ ऑगस्ट रोजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना प्रदान करण्यात येणार आहे. भारतरत्नने त्याचबरोबर आसामचे दिवंगत प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना मरणोत्तर गौरविण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यांतच या पुरस्कारासाठी या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. आजवर ४५ जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या किताबाने सन्मानित करण्यात आले होते.

भारतरत्नसाठी प्रणव मुखर्जी यांच्या नावाची घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. दरम्यान, हजारिका आणि देशमुख यांच्यासह १२ जणांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात आले आहे. सुरुवातीला भारतरत्न मरणोत्तर देण्याची तरतूद नव्हती. मात्र, त्यानंतर १९५५ पासून मरणोत्तरही या सन्मानाने सन्मानित केले जाऊ लागले.

हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे जन्मलेले नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले ज्येष्ठ नेते होते. जनसंघाचे नेते असलेले नानाजी हे राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी आणीबाणीत उजव्या आणि डाव्या पक्षांना समान राजकीय कार्यक्रम देण्यात आणि इंदिरा गांधींविरोधात संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जनता सरकारचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतर मात्र राजकारणातून बाहेर पडून त्यांनी ग्रामीण भारत स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी स्वत:ला झोकून दिले. चित्रकूट येथे त्यांनी भारतीय संस्कृती आणि शिक्षण या बाबतीत मोठे कार्य केले होते. २०१० मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

तसेच आसामात चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून भूपेन हजारिका यांनी विपुल कार्य केले. त्यांनी आसामीबरोबरच हिंदी आणि बंगाली चित्रपटांनाही संगीत दिले होते. त्यांचा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च अशा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने तसेच पद्म पुरस्कारानेही गौरव झाला होता.

Leave a Comment