रेल्वेचे स्मार्टकोच देणार गुन्हेगारांची माहिती


भारतीय रेल्वे, प्रवाशांची सुरक्षा आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव यांचा समन्वय साधणारे नवे स्मार्टकोच वापरात आणण्याच्या तयारीत असून या कोचच्या चाचण्या सुरु आहेत. पुढील तीन महिन्यात १०० रेल्वे गाड्यांना हे कोच जोडले जाणार आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्मार्टकोचच्या एआय सिस्टीममध्ये सुरक्षेच्या दृष्टीने दोन तर सुविधांच्या दृष्टीने सहा बदल केले गेले आहेत. त्यामुळे आता गाडीत कुणी संशयित चेहरा दिसला तर त्याची ओळख पटवून या कोचमधील सिस्टीम थेट कंट्रोल रूमला तशी सूचना देईल. देशभरातील गुन्हेगार व्यक्तींची माहिती आणि फोटो क्लाउड इंटरनेटच्या सहाय्याने लिंक केले गेले आहेत. कोचमध्ये नाईट व्हिजनचे चार एमपीचे कॅमेरे आत चढणाऱ्या प्रवाशांचे फोटो सिस्टीममध्ये उपलब्ध करून देतील आणि गुन्हेगार डेटाशी ताडून कुणी संशयास्पद आढळले तर थेट आरपीएफ कंट्रोलरूमला सूचना देतील.

जर कुणी प्रवासी हत्यारासह गाडीत प्रवेश करत असेल तर तशी सूचनाही दिली जाणार असून डब्यात पाणी संपले, चाके तापली, अन्य काही खराबी आली तर त्याची सूचना पुढच्या स्टेशनवरील स्टेशन मास्टरना देतील, असे सेन्सर बसविले गेले आहेत. यामुळे वेळेची बचत होईल आणि प्रवाशांना सुविधा मिळेल. रेल्वे अधिकारी रेल्वेचे लाइव स्टेट्स मोबाईल फोन, लॅपटॉपवर पाहू शकणार आहेत. उत्तर रेल्वेच्या १०० गाड्यात असे कोच तीन महिन्यात तैनात केले जात आहेत.

Leave a Comment