10 हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करा हे व्यवसाय (भाग-7)


नवीन व्यवसाय सुरू करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागत असतो. कोणता व्यवसाय सुरू करावा ? हा सर्वात प्रथम पडणारा प्रश्न असतो. त्यानंतर कोठे सुरू करायचा ?, भांडवल कसे गोळा करायचे ?, कशी सुरूवात करायची ? असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात. मात्र मुळ प्रश्न हा असतो की, कोणता व्यवसाय सुरू करावा? मागील भागात आम्ही तुम्हाला तुमची आवड जोपासून सुरू करता येणारे अनेक व्यवसाय सांगितले होते. त्यामध्ये ट्युशन सेंटर, ऑनलाईन कोर्स,  ब्लॉगिंग, युट्यूब असे अनेक व्यवसाय होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्यवसायांबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. हे व्यवसाय अगदी तुम्ही कमी खर्चात सुरू करू शकता. याचबरोबर तुमची आवड जोपासून नफा देखील मिळवू शकता.

फोटोग्राफी – 

आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे अगदी मोजकेच लोक सोडले तर स्वतःचे फोटो काढायला कोणाला आवडत नाही. त्यामुळे फोटोग्राफीद्वारे तुम्ही चांगला नफा मिळवू शकतो. मात्र मोबाईलद्वारे फोटो काढणे आणि प्रोफेशनल फोटो काढणे यामध्ये मोठा फरक आहे. तुमच्याकडे चांगल्या दर्जेचा कॅमेरा आहे असे आपण ग्राह्य धरले तर फॉटोग्राफीचा व्यवसाय तुम्ही शून्य रूपये गुंतवणूक करून सुरू करू शकता. मॉडेलिंग फॉटोशूट, बिझनेससाठी फोटोशूट असेल अथवा लग्नसमारंभात देखील तुम्ही फोटोग्राफीकरून चांगले पैसे मिळवू शकता. तुम्हाला यासाठी कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नाही. केवळ तुमचे या क्षेत्रात नाव होण्यासाठी तुम्हाला काही कालावधी जाऊन द्यावा लागेल.

पुस्तकांचा स्टॉल –

जर तुम्ही मुंबईतील फ्लोरा फाउंटन भागातून अथवा कोलकत्यातील कॉलेज स्ट्रीट येथून गेला असाल तर तुम्हाला रस्त्याच्याकडेला असलेले पुस्तकांचे स्टॉल दिसले असतील. पुण्यात देखील एफसी रोड तसेच जंगली महाराज रस्त्यावर अशीच पुस्तकांची दुकाने पाहत असतो. या ठिकाणी जुनी पुस्तके अगदी कमी किंमतीत मिळतात. कमी किंमतीत पुस्तके मिळत असल्याने वाचक आणि विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात या पुस्तकांची खरेदी करतात. तुम्ही देखील अगदी कमी गुंतवणूक करून असाच व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला आधी स्टॉलसाठी परवानगी काढावी लागेल. तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल ती म्हणजे पुस्तके खरेदी करण्यासाठी. तुम्ही जुनी पुस्तके डझन अथवा होलसेलच्या भावात खरेदी करू शकता. त्यामुळे अगदी कमी खर्चात नफा देणारा उत्तम व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता.

Leave a Comment