अजून नऊजण राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत !


मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशांत २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत उदय झाला अन् राजकारणाचे चित्रच पालटून गेले. सर्वकाही सकारात्मक नसले तरी राजकारणात अनेक पिढ्या असल्याने मातब्बर बनलेल्या घराण्यांना मोठे हादरे बसले. या घराण्यांनी वाढवलेला व्याप कायम राखण्यासाठी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत मोठ-मोठी घराणी सर्वाधिक होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाच पक्षांतराचा सर्वाधिक फटकाही बसत असून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चिंता वाढली आहे.

२०१९ पर्यंत २०१४ मधील मोदी लाट ओसरेल अशी सर्वांची भावना होती. विरोधी पक्षांनी त्यासाठी लोकसभा निवडणुकीत जोरदार तयारी केली होती. पण मोदी लाटेनंतर राष्ट्रवादाची देशात अशी लाट आली की, विरोधकांची त्या लाटेत तारांबळ उडाली. नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला, इतर नेत्यांच काय घेऊन बसलात अशी भावना तयार झाली. त्यामुळे अनेक नेते विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नसल्यामुळे पक्षांतरवर भर देत आहेत.

अनेक कारणे नेत्यांची पक्षांतर करण्याची आहेत. काही नेत्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर आपल्या शिक्षणसंस्था, सुतगिरण्या, कारखाने यांचा वाढलेला व्याप अनेक नेत्यांना सुरक्षित ठेवायचा आहे. त्यासाठी घेतलेले कोट्यावधीचे कर्ज कारणीभूत ठरत आहे. बँका सत्ता नसल्यामुळे घरापर्यंत येत आहेत. परंतु, सत्ताधारी पक्षासोबत असल्यास ही वेळ येणार नाही, अशी प्रत्येकाची भावना आहे. त्यामुळे नेत्यांचा पक्षांतरवर भर वाढला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षांतराचा सर्वाधिक फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतील २० नेत्यांनी पक्षांतर केले. यामध्ये बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, राहूल कूल, किसन कथोरे, कपिल पाटील, सचिन अहिर, लक्ष्मन ढोबळे, निवेदिता माने, विनय कोरे, संजय सावकारे, प्रसाद लाड, लक्ष्मण जगताप, बाबासाहेब देशमुख, नरेंद्र पाटील, प्रशांत परिचारक, सुरेश धस, विजयकुमार गावीत, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील, पांडुरंग बरोरा या नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारी असलेल्या नेत्यांची यादी देखील मोठी झाली आहे. यामध्ये संग्राम जगताप, वैभव पिचड, राणाजगजितसिंह पाटील, अवधुत तटकरे, बबन शिंदे, संदीप नाईक, दिलीप सोपल, चित्रा वाघ, आणि शिवेंद्रराजे भोसले हे नेते देखील राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment