निवृत्तीनंतर देश सोडण्याच्या तयारीत मलिंगा


काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून फलंदाजांची झोप उडवणारा यॉर्कर किंग लसिथ मलिंगाने निवृत्ती जाहीर केली. मलिंगाने मुथैय्या मुरलीधरन आणि चामिंडा वास यांच्यानंतर सर्वात जास्त विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

तब्बल 16 वर्ष श्रीलंकेकडून क्रिकेट खेळलेला मलिंगा निवृत्तीनंतर देश सोडून जाण्याच्या तयारीत आहे. 2014 आयसीसी क्रिकेट वर्ल्ड टी-20मध्ये याच मलिंगाने श्रीलंकेला चॅम्पियन केले होते.

आपल्या करिअरमध्ये 35 वर्षीय मलिंगाने 814 विकेट घेतल्या आहेत. पण लसिथ मलिंगा निवृत्तीनंतर आपल्या कुटुंबासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा कायम स्थानिक नागरिक असा परवाना मलिंगाला मिळाला आहे.

मलिंगा प्रशिक्षक म्हणून यापुढे क्रिकेटमध्ये राहणार असल्याचे समजते. तो ऑस्ट्रेलियात कोणत्याही संघाचा प्रशिक्षक होऊ शकतो असे म्हटले जात आहे. याआधी 2018 मध्ये मलिंगाने मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून काम केल्यानंतर 2019 मध्ये तो खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता.

गोलंदाजीमध्येच नाही तर फलंदाजीमध्येही मलिंगाच्या नावावर एक विक्रम आहे. 2010मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात एकदिवसीय मालिकेत 9व्या विकेटसाठी मॅथ्यूजसोबत 132 धावांची विक्रमी भागिदारी केली आहे.

Leave a Comment