उत्तर प्रदेश काही योगींच्या मालकीचे नाही – अनुराग कश्यप


विविध क्षेत्रातील ४९ मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 23 जुलैला देशभरात मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात पत्र लिहिले होते. यानंतर 62 कलाकारांनी पत्राद्वारेच या पत्रावर टीका केली आहे. मधुर भंडारकर यांचाही यात समावेश होता. अनुराग कश्यपने आता याच प्रकरणी मधुर भंडारकर यांच्यावर टीका करत योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मालक नसून मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे.


माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत मधुर भंडारकर यांनी अनुराग कश्यपवर निशाणा साधत म्हटले होते, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर जे लोक टीका करतात, तेच उत्तर प्रदेशात जाऊन आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण करतात आणि आपल्या चित्रपटांसाठी उत्तर प्रदेश सरकारकडून सबसिडी घेतात. योगींचा विरोध करणाऱ्या लोकांनी जोपर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत चित्रपटासाठी सबसिडी घ्यायलाही नकार दिला पाहिजे. पण हे लोक पैशांचा विषय आला की पलटतात.

अनुरागने आता यावरच प्रतिक्रिया देत एक ट्विट शेअर केले आहे. काय विनोद आहे. उत्तर प्रदेशात माझा जन्म झाला, मी तिथेच लहानाचा मोठा झालो. चित्रपटाला मिळणारी सबसिडी ही योगींनी सुरू केली नाही. उत्तर प्रदेशाचे योगी मालक नाही, राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत. मोदींचा मी समर्थक नाही. पण तरीही मी १०० टक्के भारतीय आहे. मी भारतातच चित्रपट बनवतो आणि येथून पुढेही बनवणार, असे अनुरागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment