सैनिक धोनीला संरक्षणाची गरज नाही- लष्करप्रमुख रावत


सैनिक धोनी त्याचे कर्तव्य पालन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तो सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सिद्ध झाला आहे त्यामुळे त्याला संरक्षणाची गरज नाही असे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देताना सांगितले. टीम इंडियाचा माजी कप्तान आणि भारतीय सेनेचा मानद अधिकारी महेंद्रसिंग धोनी सध्या दोन महिने लष्करात सैनिकांसोबत ड्युटी बजावत असून त्याचे पोस्टिंग जम्मू काश्मीर भागात आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षणाबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

धोनीला २०११ मध्ये टेरेटोरीयल आर्मी बटालियन मध्ये मानद लेफ्ट. कर्नलचा हुद्दा दिला गेला आहे. त्याने दोन महिने सैनिकांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्याला लष्कर प्रमुख रावत यांनी मान्यता दिली होती. ते म्हणाले, जेव्हा कुणी सेनेचा गणवेश घालतो, तेव्हा तो त्याचे काम पूर्ण करण्यासाठी सक्षम असतो. त्यासाठीच त्यांना गणवेश दिला जातो. धोनीने त्याचे बेसिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आता तो १५ दिवस त्याच्या बटालियन मधील सैनिकांसोबत पेट्रोलिंग, गार्ड व पोस्ट ड्युटी करेल. या काळात तो सैनिकांसोबत राहणार आहे.

Leave a Comment